इराणविरोधात अमेरिका आणि इस्त्रायलचं युद्ध सुरू असल्यानं आता थेट रोजगारावरदेखील परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. खामगाव येथील ‘शिवांगी बेकर्स प्रा. लि.’ ही कंपनी पार्ले प्रॉडक्ट्सच्या प्रसिद्ध ‘पार्ले-जी’ बिस्किटांचे उत्पादन करते. मात्र, व्यावसायिक गॅसच्या (एलपीजी) तीव्र टंचाईमुळे कंपनीचे उत्पादन गेल्या गुरुवारपासून (12 मार्च 2026 पासून) पूर्णपणे ठप्प झालं आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता बुलढाण्यातील स्थानिक उद्योगांवर उमटू लागले आहेत. शिवांगी बेकर्समध्ये मुख्यतः ‘क्रीम’ आणि ‘ग्लुकोज’ प्रकारची पार्ले-जी बिस्किटे तयार केली जातात. कंपनीतील मोठे ओव्हन पूर्णपणे गॅसवर (एलपीजी) चालतात. जागतिक युद्धामुळे भारतात व्यावसायिक एलपीजी पुरवठा खंडित झाला आहे. सरकारने घरगुती आणि वाहतूक क्षेत्राला प्राधान्य दिल्यानं औद्योगिक क्षेत्राला गॅस मिळणं कठीण झालं आहे. परिणामी, शिवांगी बेकर्सला आवश्यक गॅस पुरवठा मिळाला नाही. त्यामुळे ग्लुकोज ओव्हनसह संपूर्ण उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली.
या कंपनीत सुमारे 500 कामगार कार्यरत आहेत. उत्पादन बंद राहिल्यानं त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती आहे. कामगारांचे पगार, भविष्य निर्वाह निधी आणि इतर सुविधांवर परिणाम होऊ शकतो. कंपनीचे संचालक अभय अग्रवाल यांनी सांगितलं की, “आम्ही पार्ले कंपनीसाठी उत्पादन करतो. क्रीम आणि ग्लुकोज बिस्किटांचे उत्पादन होते. ग्लुकोज ओव्हन 11 मार्चपासून बंद आहे. कारण, एलपीजी पुरवठा खंडित झाला. लवकर गॅस मिळाला नाही तर कामगारांना मोठ्या अडचणींना सामोरं जावे लागेल.” कंपनीला रोज लाखोंचे नुकसान होत आहे. उत्पादन दीर्घकाळ बंद राहिल्यास बाजारात पार्ले-जी बिस्किटांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
गॅस टंचाईची समस्या फक्त खामगावपुरती मर्यादित नाही. संपूर्ण भारतात एलपीजी टंचाईमुळे इतर उद्योग बंद पडत आहेत. सरकारनं आयात वाढवण्याचा आणि घरगुती पुरवठा प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. पण, औद्योगिक क्षेत्र अडचणीत आहे. स्थानिक स्तरावर कामगार संघटना आणि प्रशासनाकडून गॅस पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. या संकटामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कामगारांच्या कुटुंबांसाठी गॅसची टंचाई हे मोठे आव्हान ठरलं आहे. सरकार आणि कंपनीकडून लवकरात लवकर उपाययोजना अपेक्षित आहेत. अन्यथा 500 कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहेत.














