kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

… आणि पोलिसांनी बळाचा वापर करत चार तासांनंतर नवले पूल मोकळा केला !

नसरापूर प्रकरणातील चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत पुण्याच्या नवले पुलावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आता हटवण्यात आलं आहे. आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत हा पूल मोकळा केला. त्यामुळे सुमारे चार तासांपासून सुरू असलेलं आंदोलन अखेर संपलं असून वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर आल्याचं दिसून आलं.

भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये शुक्रवारी, 1 मे रोजी एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. नराधमाला पोलिसांनी अटक केली असली तरी चिमुकलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले. त्यांनी पुण्यातील नवले पुलाजवळ शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केलं. चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.

नसरापूर आंदोलकांनी ऐन गर्दीच्या वेळी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरल्यामुळे पुण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या आंदोलकांनी केली. या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला.

नसरापूरच्या चिमुकलीला न्याय द्या आणि नराधमाला फाशी द्या या मागणीसाठी लोकांनी आंदोलन केलं. यासाठी त्या चिमुकलीचा मृतदेहही त्या ठिकाणी आणण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चिमुकलीच्या कुटुंबाला फोन करावा आणि नराधमाला फाशी देत असल्याचं जाहीर करावं, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. परिणामी नवले पूलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली. सुमारे चार तास हे आंदोलन सुरू होतं. यावेळी पुण्याचे आयुक्तही त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलकांशी, चिमुकलीच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.

आंदोलक मागे हटत नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला आणि नवले पूर रिकामा केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली.

दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलन संपवल्यानंतर आंदोलकांनी सरकार आणि प्रशासनावर टीका केली. नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांचा वापर करून आंदोलकांना हटवलं, सरकारची आम्हाला लाज वाटते, अशा शब्दात आंदोलकांनी टीका केली. दडपशाहीचा वापर करणारं हे इंग्रजांचं सरकार आहे, असंही काही आंदोलकांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *