अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील आगामी निवडणुकीसाठी “महामंडळ बचाव अपक्ष संघ – तिसरी आघाडी”ने आपले आठ उमेदवार येथे जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.या आघाडीला अभिनेत्री भाग्यश्री देसाई नंतर आता शाहीर संभाजी भगत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.दिग्दर्शक महेश बनसोडे यावेळी उपस्थित होते .यावेळी विक्रम गोखलेंनी दिलेल्या कोट्यवधीच्या जमिनीचे काय केले? असा सवाल सर्व माजी संचालकांना करण्यात आला.वर्षभरात पुण्यातील या जमिनीवर गोरगरीब कलावंतांना घरे देण्याची हमी महामंडळाने पुणे श्रमिक पत्रकार संघातील पत्रकार परिषदेतून दिली होती.त्यास 6 वर्षे उलटली पण या जागेचे काय केले? महामंडळाची जनरल बॉडी मध्ये नेमके काय होते हे सभासदांना कळण्याचा हक्क असताना ही बैठक लाईव्ह का करू दिली जात नाही ? असाही सवाल करण्यात आला.
महामंडळात पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि सभासदकेंद्री कारभार निर्माण करण्यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला. महामंडळातील कथित भ्रष्टाचार, अंतर्गत वाद, न्यायालयीन प्रकरणे आणि सभासदांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे सदस्यांचा विश्वास उडाल्याचा आरोप आघाडीच्या प्रतिनिधींनी केला.शिवाय या निवडणुकीत दमदाटी,धमक्या असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे,प्रचार खर्चावर मर्यादा ठेवली पाहिजे.असे म्हटले आहे. 45 हजार मतदारांचा संविधानिक हक्क डावलण्यात येण्यामागे निव्वळ प्रशासन नाही तर सर्व संचालक देखील तितकेच जबाबदार असल्याचा आरोप करत ही सर्व 5 वर्षे निवडून दिलेले असताना 10 वर्षे भोगायला मिळावीत यासाठी खेळले गेलेले राजकारण होते असेही यावेळी सांगण्यात आले.
तिसऱ्या आघाडीतील सर्व उमेदवार चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ कार्यरत असून सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सभासदांनी तिसऱ्या आघाडीला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
उमेदवार व चिन्हे
१) अमोल अरविंद भावे – दिग्दर्शक विभाग – फेटा
२) संतोष मारुत्तीराव शिंदे – अभिनेता विभाग – मोरपीस
३) अवधुत मनोहर जोशी – दिग्दर्शक विभाग – गिटार
४) मनोज उदयसिंह मराठे – निर्मिती व्यवस्था विभाग – मोटारगाडी
५) शरद निवृत्ती लोणकर – प्रसिद्धी विभाग – तबला-डग्गा
६) महादेव यशवंत शिरोळकर – निर्माता विभाग – शिट्टी
७) मानसिंग परशुराम कदम – निर्माता विभाग – छत्री
८) उल्हास भालचंद्र नांद्रे – कलादिग्दर्शक विभाग – पाटी
– महामंडळ बचाव अपक्ष संघ (तिसरी आघाडी)
















Leave a Reply