चेंबूर ११ वा रस्ता येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन त्यांना रीतसर निवेदन देण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर, शिवसेना सचिव व नगरसेवक साईनाथ दुर्गे, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्फेकर, विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, नगरसेविका स्नेहल शिवकर, नगरसेविका लक्ष्मी भाटिया, रोहिणी कांबळे, नगरसेवक रमाकांत रहाटे, नगरसेवक गितेश राऊत, विधानसभा संघटक महेंद्र नाकटे, विधानसभा संघटक निमिष भोसले, उपविभाग प्रमुख प्रशांत म्हात्रे, शाखाप्रमुख उमेश करकेरा, राजेश दौंडकर आणि विभाग अधिकारी दिपेश चव्हाण आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
काय आहे प्रकरण ?
शाळकरी विद्यार्थ्यांना घरी घेऊन चाललेल्या एका व्हॅनवर झाड कोसळून चेंबूरमध्ये ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेत चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून आठ जण थोडक्यात बचावले.
दुपारचे वर्ग संपल्यानंतर ‘युनिव्हर्सल हायस्कूल’च्या स्कूल व्हॅनने विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले असता चेंबूर रोड नंबर ११ येथे या स्कूल व्हॅनवर पिंपळाचे झाड कोसळले. यावेळी व्हॅनमध्ये १३ विद्यार्थी होते. झाड कोसळल्याचे कळताच चालक व वाहकाने स्थानिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि जवळील झेन रुग्णालयात दाखल केले. मात्र विहान श्रीवास्तव (११ वर्षे) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत ४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
या घटनेमुळे चेंबूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.











Leave a Reply