भाजपचे आमदार परिणय फुके यांनी राज ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” याचे जिवंत उदाहरण आहे. ज्यांच्या पक्षाच्या राजकारणावर सातत्याने पक्षफोडीचे आरोप झाले, त्यांनी इतरांना फोडाफोडीचे धडे देणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाप्रमाणे कधी दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार किंवा कार्यकर्ते पळवून स्वतःचे राजकारण उभे केले का? हा प्रश्न भाजपने आधी स्वतःलाच विचारावा.
गेल्या काही वर्षांत देशभरात अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे आमदार-खासदार आपल्या पक्षात घेऊन सरकारे स्थापन करण्याच्या घटनांची नोंद इतिहासात झाली आहे. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाचा “रेकॉर्ड” जर कोणाच्या नावावर असेल, तर तो भाजपचाच आहे, हे जनतेला सांगण्याची गरज नाही.
लोकशाहीत जनतेने एका चिन्हावर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना सत्तेच्या समीकरणासाठी आपल्या मांडीवर बसवून सरकारे बनवणे आणि त्यालाच नैतिकतेचा मुलामा देणे, ही राजकीय संस्कृती महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही. भाजपला बहुतेक दुसऱ्याची पोरं मांडीवर घेऊन पाळणा हलवण्यातच जास्त आनंद मिळतो; म्हणूनच स्वतःच्या कार्यकर्त्यांपेक्षा आयात केलेल्या नेत्यांवर त्यांचा अधिक विश्वास दिसतो.
दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी स्वतःचा राजकीय आरसा एकदा पाहावा. महाराष्ट्रातील सुजाण जनता सर्व काही पाहत आहे आणि योग्य वेळी त्याचा राजकीय हिशेबही करेल.











Leave a Reply