भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर हक्कभंगाची भाषा करून नैतिकतेचा आव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, “दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” ही म्हण त्यांच्यावर तंतोतंत लागू पडते. ज्यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त आणि समाजात चुकीचा संदेश देणारे वक्तव्य केले होते, त्याच व्यक्ती आज संसदीय मूल्ये, संस्कार आणि सभ्य भाषेचे धडे देत आहेत, ही महाराष्ट्रासाठी मोठी विडंबना आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, जर प्रत्येक वादग्रस्त वक्तव्यावर हक्कभंगाची कारवाई व्हायची असेल, तर सर्वप्रथम स्वतःच्या भूतकाळातील विधानांचे आत्मपरीक्षण करण्याचे धाडस भाजपच्या नेत्यांनी दाखवावे. दुसऱ्यांवर बोट दाखवताना उर्वरित तीन बोटे स्वतःकडे असतात, याचे भान त्यांनी ठेवावे. भाजपकडे राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेबाबत उत्तर नाही. त्यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांना हक्कभंगाच्या धमक्या देण्याचे राजकारण सुरू आहे.
लोकशाहीत मतभेद असू शकतात, परंतु विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी संसदीय तरतुदींचा वापर करणे हे लोकशाहीला शोभणारे नाही. सत्ता आली म्हणजे सत्याचा परवाना मिळत नाही आणि विरोधकांना गप्प बसविण्याचा अधिकारही मिळत नाही. राम कदम यांनी इतरांना नैतिकतेचे धडे देण्यापूर्वी स्वतःच्या वादग्रस्त विधानांबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी. त्यानंतरच त्यांनी इतरांना उपदेश करावा. अन्यथा त्यांची भूमिका म्हणजे “दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” एवढेच महाराष्ट्रातील जनतेला वाटेल. असे ते म्हणाले.











Leave a Reply