अयोध्येतील राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निवेदन जारी केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबळे यांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरातील दानपेट्यांच्या चोरीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तसंच दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, “पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षातून आणि लाखो रामभक्तांच्या समर्पण, त्याग व भक्तीतून उभारलेले भव्य राम मंदिर हे संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचं केंद्र आहे. अशा पवित्र स्थळी झालेल्या चोरीमुळं समाजाच्या आणि रामभक्तांच्या भावनांना तीव्र वेदना झाल्या असून, या घटनेमुळं आम्ही सर्वजण व्यथित झालो आहोत. तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारनं एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आणि त्याच्या शिफारशींच्या आधारे कायदेशीर कारवाई सुरू केली. तपासात दोषी आढळलेल्या कोणालाही कठोरतम शिक्षा मिळावी, हे सुनिश्चित करणं महत्त्वाचं आहे,” असं देखील दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटलं आहे.
पुढं दत्तात्रेय होसबळे म्हणाले, “सध्याचा गोंधळ आणि अनिश्चितता संपुष्टात आली पाहिजे. या संदर्भात मंदिर व्यवस्थापन आणि स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक सर्व आवश्यक पावले उचलतील, अशी आम्हाला आशा आहे. आम्हाला विश्वास आहे की, योग्य आर्थिक व्यवस्थापन, सुरळीत कामकाज, पारदर्शक प्रणाली आणि पावित्र्य, शुद्धता व सखोल धार्मिकतेनं भरलेल्या वातावरणाच्या माध्यमातून श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट हिंदू समाजाची श्रद्धा आणि विश्वास अधिक दृढ करत राहील.” याचबरोबर, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण हिंदू समाजाला आवाहन करतो की, या कठीण काळात आवश्यक संयम आणि धैर्य दाखवावे आणि या दुर्दैवी घटनेचा फायदा घेऊन हिंदू धर्म आणि समाजाला बदनाम करू पाहणाऱ्या हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी शक्तींचे षडयंत्र हाणून पाडावं.”
दरम्यान, राम मंदिरातील देणगीच्या कथित अपहाराचे प्रकरण 7 जूनला उघडकीस आलं होतं. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस कारवाई तीव्र झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत मंदिरातील देणगी मोजण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आठ जणांना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर, मंदिरातील देणग्यांबाबत निर्माण झालेल्या वादामुळं ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.














Leave a Reply