महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी ‘ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५’ येत्या रविवारी, १२ जुलै, २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आयोगाने उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास उमेदवारांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयोगाने दिला आहे.
उमेदवारांच्या सोयीसाठी आयोगाने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण सूचना खालीलप्रमाणे आहेत:
१. प्रवेश प्रमाणपत्र अनिवार्य:
परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
२. वेळेचे कडक पालन:
परीक्षेसाठी निश्चित केलेल्या उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या अंतिम वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
३. ओळखीचा पुरावा आणि झेरॉक्स प्रत:
उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत ठेवावे. तसेच, प्रत्येक पेपरच्या वेळी मूळ ओळखपत्राची स्पष्ट छायांकित (झेरॉक्स) प्रत स्वतंत्रपणे सादर करणे आवश्यक आहे.
४. डिजिटल उपकरणांवर बंदी:
परीक्षा कक्षात मोबाईल फोन (भ्रमणध्वनी) किंवा इतर कोणतेही दूरसंचार साधन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बाळगण्यास अथवा वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे.
५. नातेवाईक किंवा पालकांना प्रवेश नाही:
परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये उमेदवारांचे मित्र, नातेवाईक, पालक किंवा कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला कोणत्याही कारणास्तव प्रवेश दिला जाणार नाही.
६. वाहनांच्या पार्किंगची सोय नाही:
उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येण्यासाठी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगसाठी परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था केली जाणार नाही.
७. गैरवर्तन आणि नशा करण्यावर कायदेशीर कारवाई:
परीक्षेच्या वेळी उमेदवार मद्य किंवा कोणत्याही मादक अमली पदार्थांचे प्राशन करून आल्याचे आढळल्यास, त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच परीक्षा केंद्रावर सुरक्षा तपासणी (Checking) झाल्यानंतर उमेदवाराने स्वतःच्याच बैठक क्रमांकावर बसणे आवश्यक आहे.
८. उत्तरपत्रिकेवर तपशील अचूक भरा:
उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील काळजीपूर्वक आणि अचूकपणे नमूद करावा.
९. थेट ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचा इशारा:
परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास, उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. याशिवाय त्याला ठराविक कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेपासून प्रतिबंधित (Debar) करण्यात येईल आणि प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल.














Leave a Reply