‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन-चार महिन्यांपुरता उरला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही’, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी केला. ‘हेमंत पाटील, भावना गवळी यांना उमेदवारी नाकारली आहे. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांना विरोध सुरू आहे. ठाणे, कल्याणही सहज मिळत नाही’, असे दानवे यांनी सांगितले.
‘लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे तसेच नाराजीनाट्य सुरू आहे. त्यात यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांची, तर हिंगोलीमधून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष काही महिन्यांचाच सोबती आहे’, असा दावा अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
‘भाजपच्या तालावरच शिवसेनेला नाचावे लागत आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ताटाखालचे मांजर बनवले आहे’. महायुतीला यवतमाळ आणि हिंगोलीमध्ये उमेदवार बदलावा लागला आहे. या दोघांच्या बोलण्याला काही महत्त्व नाही, भाजप जे म्हणेल तेच त्यांना करावे लागते. एखाद्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाने ठरवावा, असे कधीच राज्यात झालेले नाही. जेव्हा शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व करत असताना आमचे उमेदवार बदलण्याची किंवा हा तुमचा उमेदवार असावा, असे सांगण्याची भाजपची कधीच हिंमत झाली नाही. जागावाटप हे पक्षाचे होत असते, त्यांनी त्यांचा उमेदवार ठरवायला पाहिजे, अशाप्रकारची भूमिका असते, मात्र आता भाजपने ही नवीनच नीती अवलंबली आहे’, अशी टीका त्यांनी केली.