kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘त्या’ आंदोलनाचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षी राज्यव्यापी आंदोलनं केल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. जरांगे पाटील यांनी उपोषण करून राज्य सरकारला त्यांच्या मागण्यांची दखल घ्यायला लावली होती. तसेच त्यांच्या आंदोलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पाठबळ मिळत होतं. मात्र, जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी आंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसलेले असताना पोलिसांनी त्यावर लाठीहल्ला केला. यात अनेक महिला आणि लहान मुलंदेखील जखमी झाली होती. त्यामुळे विरोधी पक्षांनी थेट गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले. त्यानंतर मनोज जरांगे यांचं आंदोलन आणखी मोठं झालं. या आंदोलन काळात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र ही टीका लोकांनी नव्हे तर शरद पवारांच्या पक्षातील लोक, काँग्रेस आणि ब्रिगेडी लोकांनी केली होती. आंदोलन काळात या लोकांनी माझ्याविरोधात कुरापती केल्या, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

देवेंद्र फडणवीस यांनी बोलभिडूला दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, त्या काळात राज्यात निर्माण झालेली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि टीका यावर भाष्य केलं. मनोज जरांगेंच्या आंदोलनकाळात तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं गेलं? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक मोठा गट यामागे होता. यामध्ये काँग्रेसचाही एक घटक होता, तसेच ब्रिगेडी विचारांचाही एक मोठा गट यात सहभागी होता. मी मराठा समाजासाठी काम करत होतो ते या लोकांना बघवत नव्हतं. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या, तेदेखील यांना पाहावलं नाही. अनेक वर्षे काही लोक मराठा समाजाचे ठेकेदार झाले होते. परंतु, मी मराठा समाजासाठी काम करू लागल्यानंतर यांचं राजकारण उद्ध्वस्त होतंय हे त्यांच्या लक्षात आलं. यांना समजलं होतं की आता आपल्याला प्रश्न विचारले जातील. तुम्ही ५० वर्षे मराठा समाजाचं राजकारण केलं, पण फडणवीस यांनी पाच वर्षात समाजासाठी इतकं काम केलं, असंच काम तुम्ही का केलं नाही या प्रश्नाची भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे माझ्याबद्दल त्यांच्या मनात एक राग आहे. परिणामी आता देवेंद्र फडणवीसांचं राजकारण टार्गेट करायला हवं, असं त्यांना वाटू लागलं. कारण फडणवीसांना टार्गेट केलं नाही तर आपली जी प्रतिमा खराब झाली आहे, ती सुधारणार नाही.

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू असताना या लोकांनी (शरद पवार, काँग्रेस आणि ब्रिगेडी) त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मला त्यांच्याबद्दल पुराव्यासह सगळी माहिती आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वॉर रूम्स तयार केल्या होत्या. जरांगे पाटील यांना देखील त्याची माहिती नव्हती. या वॉर रूम्सवरून एकच काम होतं देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं. त्या वॉर रूम्समधून जो काही कॉन्टेन्ट क्रिएट होत होता, सोशल मीडियावर व्हायरल होत होता, त्याद्वारे मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आम्ही त्या वॉर रूम्स शोधून काढल्या. मग त्यांनी त्या वॉर रूम्स छत्रपती संभाजीनगरमधून नवी मुंबईत हालवल्या. आम्ही त्या देखील शोधून काढल्या आणि मग अचानक त्या सगळ्या पोस्ट बंद झाल्या. मुळात त्या पोस्ट काही आंदोलनाशी संबंधित नव्हत्या. त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती. त्यांनी समाजमाध्यमांवर जो काही ट्रेन्ड सुरू केला होता तो कृत्रिम होता, तो ऑरगॅनिक नव्हता. त्यामुळे तो ट्रेन्ड टिकू शकला नाही.

मला या लोकांनी कितीही टार्गेट केलं तरी शिकलेला मराठा तरुण या सगळ्याला बळी पडत नाही. कारण त्याला माहिती आहे मी मराठा समाजासाठी काय काम केलं आहे. त्यामुळे या सर्व लोकांनी मला लक्ष्य करण्यासाठी कितीही खटाटोप केला तरी त्यात ते यशस्वी होणार नाहीत. आत्ता देखील तसे प्रयत्न चालू आहेत. परंतु, त्याने काहीच होणार नाही. उलट माझ्याकडे त्यांच्याबद्दलचे पुरावे आहेत, मी ते तयार करून ठेवलेत. योग्य वेळी मी ते बाहेर काढेन.