पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भाजपचेच सरकार स्थापन होणार,’ असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.नुकतीच त्यांनी हिंदी वृत्तवाहिनी आजतकला मुलाखत दिली, ज्यात त्यांनी विरोधकांवर टीका करण्यासोबतच विविध मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. यावेळी ते म्हणाले की, ‘मी आणि माझे सहकारी कमळासाठी काम करतच आहोत, पण आमचे विरोधकही कमळासाठी काम करत आहेत. आम्ही निवडणूक जिंकणार आणि देशात भाजपचेच सरकार स्थापन होणार आहे. मला सप्टेंबर महिन्यातील बैठकीसाठी पुतिन यांचा फोन आलाय. G7 मध्ये सहभागी होण्यासाठी बोलावणे आले आहे. संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भारतात भाजपचे सरकार स्थापन होणार आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी मोदींना विचारण्यात आले की, 2024 मध्ये सत्तेत आल्यास पुढील 100 दिवसात काय करणार? कोणते मोठे आणि कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात? यावर मोदी म्हणाले की, ‘निवडणुका जाहीर होण्याच्या महिनाभर आधीच मी सर्व सचिवांची मोठी बैठक आयोजित केली होती. तेव्हा मी म्हणालो होतो की, आमचे 2047 चे व्हिजन आहे आणि त्यातील 5 वर्षांचा प्राधान्यक्रम सांगा. त्याआधारे 5 वर्षांचा रोडमॅप तयार करण्यात आला. मग मी त्यातून 100 दिवसांचा प्राधान्यक्रम निवडला. 100 दिवसांच्या अजेंड्यावर विचार करत असताना मला आणखी 25 दिवसांची गरज भासली. मी 100 दिवसांचे नियोजन केले आहे, पण मला यात आणखी 25 दिवस जोडायचे आहेत. हे 25 दिवस पूर्णपणे तरुणाईवर केंद्रित करायचे आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी मोदींनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला. ‘एकाच कुटुंबातील चार जणांनी वेगवेगळ्या काळात संविधानाचा अवमान केला आहे. संविधानाबाबत अशी घाणेरडी कृत्ये करण्याची त्या लोकांची वेळ आता निघून गेली आहे. म्हणूनच मी आज मनापासून सांगतोय की, जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत धर्माच्या नावावर आरक्षण मिळणार नाही. तुम्ही धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली, आता तुम्हाला धर्माच्या आधारे आरक्षण देऊन देशाची फाळणी करायची आहे. फक्त खुर्ची मिळवण्यासाठी तुम्ही हा खेळ खेळत आहात. देश हे मान्य करणार नाही. देशाला एकत्र करण्यासाठी प्राणाची आहूती द्यावी लागली तरी, मी देईन,’ असा इशारा मोदींनी दिला.