बॉलीवूड अभिनेता वरुण धवन बाबा झाला आहे. वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. नताशाने आज बाळाला जन्म दिला असून वरुणचे बाबा व बाळाचे आजोबा डेव्हिड धवन यांनी आनंदाची बातमी दिली आहे.

नताशाची प्रसूती झाली असून तिने गोंडस लेकीला जन्म दिला आहे. डेव्हिड धवन यांनी बाळाची भेट घेऊन रुग्णालयातून निघताना नताशाने मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली. डेव्हिड धवन यांचा व्हिडीओ वरिंदर चावला या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. वरुण व नताशा यांना मुलगी झाली आहे, असं डेव्हिड धवन यांनी सांगितलं.

वरुण धवन व नताशा लग्नानंतर तीन वर्षांनी आई- बाबा झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात वरुण व नताशा यांनी ते आई- बाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करून शेअर केली होती. वरुणने नताशा व त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोमध्ये वरुण गरोदर नताशाच्या बेबी बंपचे चुंबन घेताना दिसत होता. हा फोटो शेअर करत त्याने “आम्ही प्रेग्नंट आहोत, आम्हाला तुमच्या प्रेमाची व आशीर्वादाची गरज आहे,” असं लिहिलं होतं. सेलिब्रिटी व चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत दोघांचे अभिनंदन केले होते.