‘कुमकुम भाग्य’ आणि ‘साजन घर’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिच्या निधनामुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. १४ जून रोजी तिनं नालासोपारा येथील राहत्या घरात आपलं आयुष्य संपवलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच आता या घटनेला एक वेगळं वळण आलं आहे. संचिताची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री इंद्राक्षी कांजीलाल हिनं संचिताचा सहकलाकार उज्ज्वल शर्मा याच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.
इंद्राक्षी कांजीलालनं एका मीडिया पोर्टलशी बोलताना दावा केला आहे की, ‘साजन घर’ मालिकेतील संचिताचा ऑन-स्क्रीन जोडीदार उज्ज्वल शर्मा हा तिचा मानसिक छळ करत होता. या वादामागं ‘पैसे’ हे मुख्य कारण होतं.
उज्ज्वलनं संचिताकडून काही पैसे उसने घेतले होते. जेव्हा संचितानं हक्काचे पैसे परत मागितले, तेव्हा उज्ज्वल तिच्याशी अत्यंत वाईट पद्धतीनं वागला. त्यानं केवळ तिचा अपमानच केला नाही, तर तिला धमकीही दिली होती, असा खळबळजनक आरोप इंद्राक्षीनं केला आहे.
इंद्राक्षीनं पुढं सांगितले की, तिच्याकडे संचिता आणि उज्ज्वल यांच्यामधील व्हॉट्सॲप चॅट्सचे स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ पुरावे म्हणून उपलब्ध आहेत, ज्यामध्ये उज्ज्वलनं अत्यंत अयोग्य आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे.
इंद्राक्षीच्या म्हणण्यानुसार, उज्ज्वलकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळं संचिता प्रचंड नैराश्यात गेली होती. तिची तब्येतही खालावत चालली होती. संचितानं या त्रासाबद्दल मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तक्रार करूनही सेटवर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावाही इंद्राक्षीनं केलाय. या त्रासाला कंटाळून आणि परिस्थिती बदलणार नाही हे लक्षात आल्यावर संचितानं ती मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता, असंही ती म्हणाली.














