लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्य आणि देशात रोज नवे दावे , आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहे . काल (५ जून) दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ते गैरहजर होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, हे दावे ठाकरे गटातील नेत्यांकडून फेटाळले गेले आहेत.

महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ४८ पैकी ३० जागा मिळवल्या. देशभरात एनडीएने बहुमत मिळवले असले तरीही इंडिया आघाडीनेही अनेक राज्यातील बहुतेक मतदारसंघ ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी आणि एनडीए दोघांकडूनही प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणातून धक्कादायक बातमी समोर येतेय. येत्या काळात उद्धव ठाकरे एनडीएत सामील होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यासाठी एका केंद्रीय मंत्र्यावर जबाबदारी टाकण्यात आल्याचीही चर्चा आहे. यावर ठाकरे गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.