7 डिसेंबर रोजी तेलंगणात एक शेतकरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. काँग्रेस सरकारचा नवीन चेहरा असलेले रेवंत रेड्डी हे एक शेतकरी आहे. पण त्यांची संपत्ती पाहुन तुम्ही हैराण व्हाल. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या व्यवसायाच्या रकान्यात शेतकरी असल्याचा उल्लेख केला आहे. म्हणजे एक राजकारणी असतानाच ते शेतकरी पण आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणूकीत भारत राष्ट्र समितीला दहा वर्षानंतर रोखण्यात काँग्रेसला मोठे यश आले. काँग्रेसला बहुमत मिळाले. त्यामागे काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांचा हात असल्याचे बोलले जाते.

रेवंत रेड्डी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील कोट्यवधी संपत्तीची माहिती दिली. प्रतिज्ञापत्रानुसार, सध्या रेवंत रेड्डी हे एकूण 30.04 कोटींच्या संपत्तीचे मालक आहे. त्यांच्याकडे 5.17 कोटी रुपयांपेक्षा जास्त जंगम मालमत्ता आहे. तर 24,87,87,500 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. या संपत्तीत त्यांच्यासह पत्नीचा वाटा आहे. पत्नीकडे 15,02,67,225 रुपयांची तर रेवंत रेड्डी यांच्याकडे 8,62,33,567 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 2,18,93,343 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावार 2,92,68,008 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

रेवंत रेड्डी आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 7.77 कोटी रुपयांची शेती आहे. त्यांच्याकडे 4.82 कोटी अकृषक जमीन आहे. पती आणि पत्नीकडे दोन बंगले आहेत. त्यांची किंमत 12.28 कोटी रुपयांहून अधिक आहे. या पती-पत्नीकडे व्यावसायिक जमीन नाही. त्यांच्या पत्नीच्या नावे रिअल इस्टेटमध्ये 2,16,770 रुपयांची गुंतवणूक आहे. तर एलआयसीमध्ये 5 लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे 1235 ग्रॅम सोने आहे. त्याची किंमत 83,36,000 रुपये आहे. तर 7,17,800 रुपयांची चांदी आहे.