विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अशातच, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. अद्याप यामागचे खरे कारण समोर आलेले नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. राज ठाकरे यांनी विविध मतदारसंघाची चाचपणी करण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान, आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट मुंबईत होत आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज निवासस्थानी आशिष शेलार नुकतंच दाखल झाले आहेत. या भेटीमागे नेमकं काय कारण आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष शेलार आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल राज ठाकरेंशी संवाद साधणार असल्याचे बोललं जात आहे.
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बैठकांचे सत्र सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेत आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी या जागांसाठी उमेदवारांची चाचपणीही सुरु केली. त्यातच काही दिवसांपूर्वी मनसेकडून दोन उमेदवारांची घोषणादेखील करण्यात आली. मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसघांतून मनसे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंढरपुरातून दिलीप धोत्रे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे राज्याचा दौराही करत आहेत. यावेळी ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करत आहेत.