Breaking News

गेल्यावर्षी मंत्रीमंडळ बैठक घेऊन केलेल्या 60 हजार कोटींच्या घोषणांचा हिशोब द्या, मगच मराठवाड्या पाय ठेवा – अंबादास दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे. गेल्यावर्षी मंत्रीमंडळ बैठक घेऊन केलेल्या 60 हजार कोटींच्या घोषणांचा हिशोब द्या, मगच मराठवाड्या पाय ठेवा, असा इशाराच अंबादास दानवे यांनी दिला आहे.

महायुती सरकारने गेल्यावर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. त्यावेळी 60 हजार कोटींच्या कामाची घोषणा केली. मात्र त्यातील 60 कोटी रुपयांचे सुद्धा काम झाले नाही. कोकणातून मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. मात्र त्याचेही काही झाले नाही, सरकार एकप्रकारे मराठवाड्यातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम करते आहे.

सरकार मागचा पाढा गिरवण्याचे काम करत असून आधीच्या घोषणांचा सरकारने हिशोब द्यावा आणि मग मराठवाड्यात यावे, असे दानवे यांनी म्हटले आहे. गेल्यावर्षी तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. विभागातील प्रलंबित प्रश्न आणि टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. यापूर्वी मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी म्हणजेच 4 ऑक्टोबर 2016 रोजी संभाजीनगरमध्ये मंत्री मंडळाची बैठक पार पडली होती.

मागील 15 वर्षात विभागात आतापर्यंत फक्त तीन वेळा बैठक झाली होती. 2008 मध्ये दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात बैठक झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर सप्टेंबर 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरात मंत्रीमंडळ बैठक घेतली होती. आता त्यांच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा बैठक होण्याची शक्यता आहे.