kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“मालवणमध्ये महाराजांचा पुतळा तुटला नाही तोडला” ; संजय राऊतांचा गंभीर आरोप

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी एक धक्कादायक वक्तव्य केले. “तुम्हीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडलात. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांनीही याबद्दल आक्रमक पावित्रा घेतला आहे. आता याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला नाही तुम्ही तोडलात”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

“ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथांनी मराठा साम्राज्य लयास नेलं आणि सर्वात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटीशांचा यूनियन जॅक फडकवला त्या पेशव्याचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत. त्याशिवाय त्यांनी अशी भाषा केली नसती. देवेंद्र फडणवीस कोणता इतिहास सांगत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देण्यास विरोध करताय. मालवणमध्ये महाराजांचा पुतळा तोडला हे तुमचं पाप आहे. तुम्हीच तोडलात. तुटला नाही तोडलात”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कोट्यावधींचा घोटाळा करणारे आजही मोकाट आहेत. त्यांना तुम्ही अटक करु शकत नाही. कारण ते तुमचे पेशवाईचे शिलेदार आहेत. शिवसैनिक जेव्हा मालवणला गेले, तेव्हा त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचे काम जे भाजपचे गुंड करत होते. तुम्ही त्यांचे समर्थक आहात. पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे तुमचे गुंड आम्हाला महाराजांचा इतिहास शिकवणार का? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात. वेगळा विदर्भ करणं हे तुमच्या मनात आहे की नाही?” असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.

“जर तुम्ही छत्रपती शिवरायांचे खरे भक्त असाल तर तुमची बेळगाव-कारवार सीमाप्रश्नाविषयी तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा. महाराजांचं राज्य हे मराठी माणसांचं मावळ्याचं राज्य होतं. तुम्ही ते संपवायला निघालेले आहात. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, हा नवीन चिंतनाचा विषय तुम्ही समोर आणला आहात. तुम्हाला इतिहास काय माहिती, तुम्ही शिवरायांच्या इतिहासाचे शत्रू आहात. महाराजांनी एकदा नव्हे दोनदा सुरत लुटली, ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली. भाजपच्या प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.