विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष रणनीती आखू लागला असून उमेदवारीसाठी तगड्या चेहऱ्यांचा शोधही सुरू झाला आहे. काँग्रेसला यात यश आलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ते वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगलं यश मिळवलेल्या काँग्रेसनं विधानसभेचीही जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेशी वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. त्याआधीच काँग्रेसनं उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. राजकारणात सक्रिय होण्याच्या विचारात असलेल्या संजय पांडे यांनी काँग्रेसची निवड केली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना संजय पांडे हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. तसंच, त्यांनी राज्याचं पोलीस महासंचालक पदही भूषवलं आहे. पांडे यांच्या पक्ष प्रवेशामुळं काँग्रेसला आणखी एक उत्तर भारतीय चेहरा मिळेल. संजय पांडे यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांनी हा विचार सोडून दिला होता. संजय पांडे हे उद्धव ठाकरे यांच्याही जवळचे मानले जातात. वर्सोवा विधानसभेवर ठाकरेंच्या शिवसेनेनंही दावा केला आहे. आता पांडे यांच्यासाठी शिवसेना ही जागा सोडते का हे पाहावं लागणार आहे.