शिवसेना ठाकरे गटाची तातडीची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. याचवेळी आदित्य ठाकरे मात्र शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

‘तुटेल इतकं ताणू नये’ असं उद्धव ठाकरे यांनी सांगूनही काँग्रेस- ठाकरे गटातील वाद मिटत नाहीये. जागावाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला गेले आहेत. अशातच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी बैठकीसाठी संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, सुभाष देसाई आणि वैभव नाईक मातोश्रीवर पोहोचले आहेत. मिलिंद नार्वेकर, राजन विचारे मातोश्रीवर बैठकीसाठी दाखल झालेत. ही बैठक आता सुरु होत आहे.

आदित्य ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरला जात आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांना भेटायला आलो, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. मात्र काँग्रेस- शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही भेट घेतल्यांचं समजतं आहे.

नेमका वाद काय?

परवा दिवशी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोन नेत्यांमध्ये विदर्भातील जागांवरून मतभेद झाले. नाना पटोले असतील तर जागा वाटपाच्या चर्चेत आम्ही उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली. त्यानंतर आता हे वाद विकोपाला गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *