भाजपाने कटेंगे तो बटेंगे असा नारा दिला असून हिंदू समाजाच्या मतपेढीला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांनीच या घोषणेचा विरोध केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन कटेंगे तो बटेंगे असा नारा देत आहेत. पण हा महाराष्ट्र आहे, इथे कटेंगे, बटेंगे चालत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. तरीही भाजपाने हा मुद्दा रेटून धरला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांच्या या भूमिकेबद्दल भाष्य केले असून अजित पवारही लवकरच भगवे होणार असल्याचं म्हटलं आहे.
टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजित पवार हे पलीकडून आमच्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आमच्या गोष्टी लक्षात येत नसतील. त्यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ हा नारा ठिक नसल्याचं म्हटलं असलं तरी त्यांनी ‘एक है तो सेफ है’ हा नारा ठिक असल्याचं म्हटलं आहे. याचा अर्थ ग्लास अर्धा रिकामा आहे. अजित पवारांना सुचवायचे आहे की, ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणून नका, ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणा. आम्हाला त्यांची भूमिका मान्य आहे.”
अजित पवार यांची विचारसरणी भाजपाशी जुळत नाही, त्याचे काय? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. “आमची संपूर्ण विचारसरणी जुळली असती तर त्यांचा वेगळा पक्ष कसा राहिला असता. आम्ही आधीच जाहीर केले आहे की, आमची आणि त्यांची राजकीय युती आहे. ते आता आमच्या बरोबर आले आहेत, हळूहळू तेही आमच्या विचारात रंगतील. अजित पवार यांनाही आम्ही भगवे करू”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवार तर महायुतीमधील आहेत. पण भाजपामध्ये असलेले पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाण यांनीही बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर नापसंती व्यक्त केली आहे. या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांनाही बहुतेक हे समजलेले नाही. त्यांनी या घोषणेचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. सर्वांना ही गोष्ट समजेलच असे नाही. त्यांना आम्ही समजावून सांगू.