आष्टी येथील सभेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सज्जड दम दिला आहे. “महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला धक्का लागणार नाही, हा अजित दादाचा वादा आहे. विरोधक सांगतात चालू बिल दिलं मागचं बिल भरू नका. विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला जातो आहे. त्यास बळी पडू नका, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येऊ द्या. राज्यातील योजना सुरू ठेव्याच्या असतील तर आष्टी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना निवडून द्या, मग बघा कोणता मायचा लाल योजना बंद करणार नाही.” असे म्हणत आष्टी येथील सभेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सज्जड दम दिला आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ आज अजित पवार यांची जाहीर सभा झाली यावेळी बोलताना “पंकजा ताई आमच्या बहीण आहेत, तर धनंजय आमचा भाऊ आहे. दिवाळीमुळे प्रचाराला दिवस कमी मिळाले. मात्र आमच्या बहिनेने सांगितलंय घडी गेली की पिढी जाते. त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी पडू नका. मराठवाड्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमदेवराला निवडून द्या आणि इतरांचा इतिहास तपासा,” असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.
याचवेळी, अजित पवार यांनी विरोधकांना सज्जड दम देत लाडक्या बहिणींना भावनिक साद घातली आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 ते 2024 या कालावधी दरम्यान आम्ही 24,000 कोटी रुपायांचा विकास निधी दिला आहे. काही प्रमाणात मराठवाडा मागासलेला भाग आहे. मात्र मागास म्हणून आपण किती दिवस मागासच राहायचं, त्यात काही तरी सुधारणा झाली पाहजे की नाही? परिणामी त्यासाठी खूप काही करायचं आम्ही ठरवलं आहे. त्यातूनच आम्ही 4 टीएमसी पाणी आपल्याला इथे आणायचे आहे. इथे पाणी आणणे इतकं अवघड राहीलं नाही.
आणखी साडे चार वर्ष केंद्रात आपलं सरकार आहे. या प्रकल्पासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. मोदी यांना म्हणालो होतो महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे. मात्र लोकसभेला निकाल म्हणावं असा लागला नाही. आम्हाला त्याचं वाईट वाटलं, मात्र राजकीय जीवनात काम करताना खाचायच नसतं. आम्हाला 400 पार पाहिजे त्याचं खोटा प्रचार विरोधकांनी केला. पुन्हा आमचं सरकार येणार आणि पुढील पाच वर्ष आम्ही महिलांना योजना देणार, आम्ही सर्व जाती धर्मांना न्याय देत आहोत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.