Breaking News

सुनील तटकरे यांनी शिंदे गटाची झोपच उडवली ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील यशाचा जल्लोष अजून संपला पण नाही तर दुसरीकडे अजितदादा गट आणि शिंदे गटातील शिलेदारांनी बाह्या वर केल्या आहेत. दोन्ही गटातील शा‍ब्दिक युद्धाने पेट घेतला आहे. खास भात्यातील बाण काढत एकमेकांची उणेदुणे काढण्यात येत आहेत. निवडणुकीत कसे एकमेकांचे पाय ओढण्याचा प्रयत्न झाला याचा बाजार चव्हाट्यावर मांडण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे सध्या आमने-सामने आले आहेत. बेछुट आरोपांच्या फैरी दोघेही झाडत आहे. त्यामुळे महायुतीत सुद्धा आलबेल नसल्याचे चित्र आहे.

अजित पवार गटाने मुख्यमंत्री पदासाठी भाजपाला पर्यायाने देवेंद्र फडणवीसांना थेट पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे महायुतीचे सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या शिवसेना शिंदे गट मात्र मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे. त्यासाठी बिहारपासून ते राजस्थानपर्यंत अनेक पॅटर्नची चर्चा या गटातील नेते सध्या करताना दिसत आहेत. त्यातच आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बॉम्ब टाकला आहे.

मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा अमित शहा यांच्या स्तरावर होईल, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगीतले. भाजपच्या आणि वरिष्ठ नेत्यांकडून ते अपेक्षित आहे. तेच यावर तोडगा काढतील. मुख्यमंत्री पदाचा कोणताही फार्मूला ठरला नाही. दोन दिवसात सगळ काही ठरेल, असे सांगून त्यांनी शिंदे गटातील दाव्याची हवाच काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

महाविकास आघाडीने ईव्हीएममधील घोळावर राज्यातच नाही तर देशपातळीवर रान पेटवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे. त्यावर तटकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. रडीचा डाव या पेक्षा काही नाही. मोठ्या राज्यात यश मिळाल तेव्हा ही मंडळी डांगोरा पीटत होती. रडीचा डाव खेळण्याची आवश्यकता नाही. अस्वस्थ झालेल्याच्याकडून अशी वक्तव्य येऊ शकतात. २६ नोव्हेंबरच्या आधी विधानसभा गठीत होणं आवश्यक होत. निवडणूक आयोगाने यादी राज्यपालांना दिली आहे. विधानसभा अस्तित्वात आली आहे. त्यामुळे कायदेशीर अडचण राहिली नाही, असे ते म्हणाले.

दुसरीकडे महायुतीमधील अजितदादा गट आणि शिंदे गट या निमित्ताने आमने-सामने आल्याचे दिसले. तटकरे यांनी मला पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप कर्जत-खालापूर मतदारसंघाचे शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी केला होता. क्षुल्लक माणसाची दखल घ्यायाची नाही, त्याची पात्रता नाही, त्यावर मला काही बोलायचं नाही असा खोचक टोला त्यांनी केला. माझ्या पक्षातल्या कोणाला मंत्री करायच हे आमचे नेते ठरवतील, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *