kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शपथविधीआधी राऊतांनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा, शिंदेंवर साधला निशाणा तर अजितदादांचं केल कौतुक

महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी आज होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. यावर प्रतिक्रिया द्याव असं काही नाही. राज्याचा निकाल धक्कादायक आला. त्यातून अजून राज्यातील जनता सावरलेली नाही. गावागावात मॉक पोल सुरू आहेत. पण तिथे १४४ लागू केलं जातं आहे. बहुमत असतानाही १३ दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाही. अखेर आज आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. राज्याच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, असं राऊत म्हणाले.

राज्य लूट न होण्याची जबाबदारी तुमची असेल. मागच्या अडीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले. फडणवीसांना शुभेच्छा…, असं राऊत म्हणालेत. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? याबाबतची स्पष्टता आलेली नाही. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय राहिलेला नाही. दिल्लीसमोर लढायची ताकद त्यांच्यात नाही. ती त्यांनी अडीच वर्षांपूर्वीच गमावली आहे, असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांचं राजकारण वेगळं आहे. त्यांनी दिल्लीसोबत व्यवस्थित जुळून घेतलं आहे. दिल्लीने त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. पुढील ५ वर्ष राज्यात धुमशान बघायला मिळेल. सलग ६ वेळा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन… एक प्रकारे उपमुख्यमंत्री पदाचं आरक्षण त्यांच्यासाठी ठेवलं आहे, असं म्हणता येईल. त्यासाठी अनेकांचं योगदान आहे. उत्तम सहकार्य म्हणून अजित पवार यांनी काम केलं. उद्धव ठाकरे देखील अजित पवार यांचं नेहमी कौतुक करतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे.