मी जेव्हा-जेव्हा श्रीरामांचे दर्शन घेतले आहे, त्यात काळाराम मंदिरात येऊन जास्त दर्शन घेतले आहे. अयोध्येनंतर नाशिकचे काळाराम मंदिर हे माझ्यासाठी कायम श्रद्धेची जागा आहे. खरे म्हणजे राम नवमीला देशभरात विविध ठिकाणी उत्सव साजरे होतात. पण हे जे काळाराम मंदिर आहे, त्याचे या देशातील सामाजिक संघर्ष आणि चळवळीत फार मोठे योगदान आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यायला हवे. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस तीर्थयात्रा फार करतात. परंतु, गेल्या २० ते २५ वर्षांपासून ते काळाराम मंदिरात का आले नाहीत, हा माझ्यापुढे कायम प्रश्न आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
श्रीराम नवमी निमित्त काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेतल्यानंतर संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, खरे म्हणजे जशी आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची शासकीय पूजा होते, तशी इथे राम नवमीला काळाराम मंदिरात शासकीय पूजा व्हायला हवी, या मताचा मी आहे. या ठिकाणी शासकीय पूजा होऊन ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. कारण हे फक्त धार्मिक स्थान नाही. तर महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे, संघर्षाचे मोठे केंद्र आहे. मुख्यमंत्र्यांनी यायला हवे, असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.
हा बहुजनांचा देव आहे म्हणून देवेंद्र फडणवीस आले नाहीत की, त्यांच्या मनात काळाराम मंदिराविषयी काही अढी आहे का, मला माहिती नाही. पण असे असू नये. पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो ना. त्या पुरोगामी महाराष्ट्राचे हे देवस्थान आहे. म्हणून आम्ही इथे येतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच एका प्रश्नावर बोलताना शरद पवार यांना चिमटा काढणे अजिक पवारांना परवडणारे नाही, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारावर प्रतिक्रिया देताना, सगळे समोर आले आहे. इस्पितळ हे माणुसकी दाखवायची जागा आहे. सरकार चौकशी करेल, असे संजय राऊत म्हणालेत.
Leave a Reply