kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

Covid-19 पुन्हा वाढतोय ; मुंबईनंतर पुण्यातही कोरोनाचा शिरकाव

हाँगकाँग आणि सिंगापूर येथे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असतानाच येथील केईएम रुग्णालयात दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हे मृत्यू करोनामुळे झाले नसून सहव्याधींमुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, केईएममधील सात रुग्णांची करोना चाचणी सकारात्मक आल्याने त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

परळ येथील ५८ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तिला केईएममध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी, १८ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी घेण्यात आलेल्या स्वॅब चाचणीत तिला करोना असल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वी १३ वर्षीय मुलीचाही करोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले, असा दावा माजी महापौक किशोरी पेडणेकर यांनी केला. मात्र, ५८ वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे तर १३ वर्षीय मुलीचा मूत्रपिंड विकार या सहव्याधींमुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

मुंबईत कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती आहे. पुण्यातील एका रुग्णालयात ८७ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. यंदाचा हा पहिलाच रुग्ण आढळला आहे, पण नागरिकांची धाकधूक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.