kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

लष्कर-ए-तैयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार, प्रकृती गंभीर

पाकिस्तानातून लष्कर-ए-तैयबाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लष्कर-ए-तैयबाचा सहसंस्थापक आणि दहशतावाद्यांच्या म्होरक्या आमिर हमजा हा रहस्यमयरित्या जखमी झाला आहे. आमिर हमजावर गोळीबार करण्यात आला आहे. आमिर हमजा हा हाफिज सईदचा अत्यंत जवळचा आहे. गोळीबारात आमिर हमजा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याचे वृत्त आहे. लाहोर येथील एका रुग्णालयात तो मरणयातना भोगत आहे.

गेल्या तीन महिन्यात तीन मोठ्या दहशतवाद्यांचा पाकिस्तानात अज्ञातांकडून खात्मा करण्यात आला आहे. २००५मध्ये बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेवर झालेल्या हल्ल्यामागे हमजाचाच हात होता. ६६ वर्षीय हमजा त्याच्या घरी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याला आयएसआयच्या संरक्षणाखाली लाहोरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेच्या फक्त तीन दिवस आधी, लष्कर-ए-तैयबाचा एक हाय प्रोफाइल ऑपरेटिव्ह आणि दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी जबाबदार असलेला अबू सैफुल्लाह यालाही पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून ठार मारल्याचे वृत्त हाती आले आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला शहराशी संबंधित असलेल्या हमजाला अमेरिकेने २०१२ मध्ये जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याला अफगाण मुजाहिदीन म्हणून संबोधले जाते होते. हमजा हा हाफिज सईद आणि अब्दुल रहमानचा निकटवर्तीय देखील मानला जातो.

आमिर हमजाचे दहशतवादी कारनामेः-

  • जम्मू आणि काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी,
  • ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांचा पुरवठा दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालवण्यात सहभागी.
  • लष्करासाठी निधी उभारण्यात महत्त्वाची भूमिका.
  • नवीन दहशतवादी भरती करण्यातही महत्त्वाची भूमिका.
  • मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हमजा ऑपरेशनल कमांडर होता.
  • काश्मीरमधील शिव खोरी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ल्यात सहभागी