kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुसळधार पावसाने मुंबईत मेट्रो स्टेशन तुंबलं, प्रशासनानं दिलं हे कारण

यंदा मान्सून नेहमीपेक्षा तब्बल 8 दिवस आधी दाखल झाला आहे. दरवर्षी साधारण 20 मेपर्यंत अंदमान-निकोबार आणि 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणारे नैऋत्य मोसमी वारे यावेळी 13 मे रोजीच निकोबारमध्ये दाखल झाले होते.

राज्यभरात काल (25 मे) रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झालीय. मुंबईला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला असून ठिकठिकाणी याचे परिणाम दिसून येत आहेत. नुकत्याच सुरु झालेल्या मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईनवर असलेल्या एका मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलं. . अ‍ॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या प्रवेश/निकास मार्गावर पावसाचं पाणी शिरलं.

सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर-रिटेनिंग वॉल (भिंत) कोसळल्याने ही घटना घडली. त्यामुळं आचार्य अत्रे भुयारी मेट्रो स्थानकावर पाणी साचल्याचं दिसून आलं.

यासंदर्भात मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, “स्थानकाचं काम अपूर्ण आहे. त्यामुळं जिथून पाणी शिरलं तो मार्ग स्थानकावर येण्यासाठी किंवा बाहेर पाडण्यासाठी वापरला जात नव्हता.

अजूनही तिथं काम पूर्ण झालेलं नाही. (येत्या 3 महिन्यांत होईल). मात्र तूर्तास तिथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू होतं. हे काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसामुळे ही भिंत पडली.” मेट्रो 3 प्रशासनाने पुढे म्हटलं की, “खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे.”

राज्यभरात रविवारी (25 मे) रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याच्या घटना घडल्या असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पुण्यातील बारामतीमध्ये कालवा फुटल्याचीही घटना घडली. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

कोकणात मुसळधार, रस्ते ठप्प

रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. पावसाने संपूर्ण जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यानंतर अनेक ठिकाणचे रस्ते ठप्प झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक पावसामुळे ठप्प झाली आहे. फुरूस इथं पुलाचं काम सुरु होतं… त्या ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं लोकांना त्रासाला सामोरं जावं लागलं.