kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले

अहमदाबाद दुर्घटनेत डोंबिवलीकर रहिवासी रोशनी सोंनघरे(२७) रा. उमिया बिल्डींग, तळमजला, राजाजी पथ, मढवी बंगल्याजवळ डोंबिवली पूर्व हिचे निधन झाले. ती दोन वर्षांपासून एअर इंडियात कामाला होती. तिला एअर होस्टेस व्हायचे होते ते तिचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. भाऊ विघ्नेश हा शिपिंग कंपनीत कामाला आहे. वडील राजेंद्र सोनघरे टेक्निशियन म्हणून काम करतात. रोशनी या आधी स्पाईस जेट या विमान कंपनीत कामाला होती. लहानपणापासून तिला एअर होस्टेस व्हायचे होते, ते तिचे स्वप्न होते. आई राजश्री सोनघरे हिच्याशी ती अपघातापूर्वी सकाळी फोनवर बोलली होती, तेच तिचे घरच्यांशी शेवटचे संभाषण झाल्याचे सांगण्यात आले. घटना कळताच तिचे वडील, भाऊ हे अहमदाबाद येथे रवाना झाले आहेत. कंपनीने अद्याप त्यांना याबाबत काहीही कळवले नसल्याचे सांगण्यात आले. तिचे लग्न ठरल्याचीही नातेवाईकांत चर्चा सुरू होती.

आई घरीच असून आईचा भाऊ रोशनीचा मामा प्रवीण सुखदरे यांनी त्याबद्दल माहिती दिली. डोबिवलीत रहायला येण्याआधी ते ग्रँटरोड येथे वास्तव्याला होते, तिचे सर्व शिक्षण तेथेच झाले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश संपादित केले होते. मध्यमवर्गीय घरातील रोशनी हिच्या निधनामुळे डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर, मंदार हळबे आदींनी तिला श्रद्धांजली वाहिली.