kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नांदेडमधील केळी उत्पादकांना फटका ; बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. घडाने वाकलेले केळीची झाडे अक्षरश: आडवी झाली आहेत. परिणामी, स्थानिक बाजारपेठेत केळीचे भाव निम्म्याने घसरले. निर्यातक्षम केळी मात्र, आजही २ हजार रुपये क्विंटल या दराने प्रवास करत आहे.

एका तासाच्या वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने नांदेडमधील अर्धापूर, मुदखेड, हदगाव या तालुक्यांतील ६८ गावांतील पाच हजार ७१३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात चार हजार १३३ हेक्टरवरील केळीच्या बागा भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला आहे. येथील केळी जळगावनंतर प्रसिद्ध असून, अफगाणिस्तान व इराण, ओमान तसेच अन्य देशांमध्ये निर्यात केली जाते. निर्यातक्षम माल आजही २ हजार ते बावीसशे रुपये प्रतिक्विंटल भावाने जात आहे. परंतु, स्थानिक बाजारपेठेत केळीचे भाव घसरले आहेत.

मागील आठवड्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठ्याची साखळी बिघडली. झाडे घडासह पडल्याने अर्धवट लगडलेला माल बाजारात आणावा लागला. त्यामुळे केळीचे भाव ठोक बाजारात मोठे घटले. १५ दिवसांपूर्वी २ हजारांच्या पुढे असलेला भाव आता एक हजार २०० ते एक हजार ४०० रुपये प्रती क्विंटल या स्तरावर येवून पोहोचला. यामुळे केळी उत्पादकांचे नुकसान झाले. पुढील आठवड्यापर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे सांगण्यात आले.

दरम्यान, काढणीस आलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव या तालुक्यातील केळी देश विदेशात निर्यात केली जाते. या भागात केळी लागवडीचे क्षेत्र चांगले असल्याने या भागातील अर्थव्यवस्था केळीवर अवलंबून आहे.

यंदाच्या कडक उन्हाळ्यात थेंब थेंब पाणी देऊन केळीच्या बागा शेतकऱ्यांनी जतन केल्या होत्या. यंदाच्या हंगामात भावही चांगला होता. त्यामुळे चार पैसे जास्त मिळतील या आशेवर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी होते. परंतु वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तासाभरात होत्याचे नव्हते झाले. यामुळे उत्पादन तर बाजूला राहिले लागवड खर्च निघणे कठीण झाले आहे. या वादळाचा फटका नांदेडमधील अर्धापूर, मुदखेड, हदगाव या तालुक्यांतील ६८ गावांतील पाच हजार ७१३ शेतकऱ्यांना बसला आहे. यात चार हजार १३३ हेक्टरवरील केळीच्या बागा भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, प्रल्हाद इंगोले यांनी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांनी पालकमंत्री अतुल सावे यांची मुंबईत भेट घेऊन मदतीची मागणी केली.