आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 5200 हून अधिक एसटी सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ अधिवेशनदरम्यान दिली. विशेष म्हणजे दरवर्षी अंदाजे 5 हजार एसटी सोडण्यात येत असतात. परंतु यंदा 200 अधिक एसटी सोडणार असून, भाविकांना पंढरपूरपर्यंत प्रवास करताना गैरसोय होऊ नये, याची काळजी राज्य परिवहन मंडळ घेत असल्याचे प्रताप नाईक यांनी अधोरेखित केलंय.
वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा :
वारकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वारकऱ्यांना त्यांच्या गावावरून येण्यासाठीच नाही तर परतीच्या प्रवासासाठीदेखील एसटी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दरवर्षी 5 हजार एसटी सोडल्या जातात, परंतु यंदा 200 अधिकच्या एसटी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाढवल्या आहेत. तसेच वारीमध्ये आरोग्य व्यवस्था पूर्णपणे सक्षम असल्याचा दावा त्यांनी केलाय. शिवाय एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची सोय स्वतःच्या खर्चाने केल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
मी काल टॅक्सी बाईकस्वार परवानगी नसताना प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर आल्यानंतर या टॅक्सी बाईकना परवानगी दिलेल्या अधिकाऱ्यांना खुलासा देण्याचे आदेश दिलेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच, असे यावेळी सरनाईक यांनी सांगितलंय. सार्वजनिक मंडळांना स्पॉन्सरशिप दिली म्हणजे आमचे सरकार विकत घेतलं आहे का? असा सवाल करत नियमावलीच्या आधारे प्रवासी वाहतूक होत नसेल तर कारवाई होणारच, असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय.
टॅक्सी बाइकबाबतचे प्रकरण नक्की काय? :
शासनानं नुकतंच ई-बाइक धोरण जाहीर केलंय. त्यानुसार विविध अटी-शर्तीचं पालन करणाऱ्या आणि केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांना यापुढं बाइक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळं सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाइक टॅक्सी या अनधिकृत आहेत.













