kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दुःखद बातमी ! लोकमान्य टिळकांचे पणतू ,‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन;मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

एक दुःखद बातमी समोर येत आहे. पुण्यात लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दिपक टिळक यांचं निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या ७४ व्य वर्षी दिपक टिळक यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. ‘लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व असलेले दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे अशा शोकभावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळक आणि त्यांचे सुपुत्र दिवंगत जयंत टिळक यांच्याकडून मिळालेला वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे चालविला. ते राजकारणात फारसे रमले नाहीत. पण लोकमान्य टिळक यांनी पाया घातलेल्या दैनिक केसरी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य त्यांनी तितक्याच जबाबदारीने सांभाळले. यातून ते कित्येक सामाजिक संस्था, संघटना, विश्वस्त मंडळांचे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना समाजातून पाठबळ मिळत राहिले. डॉ. टिळक हे व्यवस्थापन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक होतकरू युवकांनाही या क्षेत्रातील संशोधनाची प्रेरणा मिळाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक असे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे. ही या क्षेत्रासाठी हानी आहे. टिळक यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर, विविध संस्था, संघटना आणि सामाजिक उपक्रमांशी निगडित कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वराला प्रार्थना करतो. डॉ. दीपक टिळक यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे डॉ. दीपक टिळक हे पणतू होते. ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद त्यांनी भूषवलं असून ते काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांच्या कार्यकाळात मोठी उंची प्राप्त झाली. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा त्यांनी पुढे नेला. वर्ष २०२१ मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.