दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरली आहे. त्यामध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला. या स्फोटापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांना अटक केली. तसेच, आणखी काहींना ताब्यातही घेण्यात आलं आहे. अटक केलेल्यांपैकी तिघे व्यवसायाने डॉक्टर आहेत.
“15 दिवस चाललेल्या संयुक्त मोहिमेचं हे फलित आहे आणि ही मोहीम अजूनही सुरू आहे,” असं फरिदाबादचे पोलीस आयुक्त सतेंद्र कुमार गुप्ता यांनी या कारवाईबाबत सांगितलं. परंतु, पोलिसांनी अटक केलेल्यांचा दिल्ली स्फोटाशी काही संबंध आहे का, याबाबत काही सांगितलेलं नाही. दिल्ली स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे.
दिल्लीतील स्फोटापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी 10 नोव्हेंबर रोजी सात जणांना अटक केल्याचा दावा केला होता. पोलिसांचं म्हणणं आहे की, हे लोक बंदी घालण्यात आलेल्या कट्टरपंथी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंद यांच्याशी संबंधित आहेत. मात्र या अटकेवर आरोपींचे कुटुंबीय प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, सुरक्षा यंत्रणा अटक केलेले डॉ. अदील, डॉ. मुझम्मिल शकील आणि शाहीन सईद यांच्यामध्ये काही नेटवर्क लिंक आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून अटक
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशामधील सहारनपूर येथून डॉ. अदील अहमद राथरला अटक करण्यात आली. त्याच्या आधार कार्डवर अनंतनागचा पत्ता आहे. ही अटक सहारनपूरच्या अंबाला रोडवरील फेमस हॉस्पिटलमधून करण्यात आली होती. डॉ. अदीलवर कट्टरपंथी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्याचा आरोप आहे. तो जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, त्याने अनंतनागमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पत्रकं लावली होती.
पोलिसांचं म्हणणं आहे की, तपासादरम्यान श्रीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, ज्यात डॉ. अदील पोस्टर लावताना दिसला. याच फुटेजच्या आधारावर त्याला सहारनपूरहून अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.अदील सुमारे तीन वर्षांपासून सहारनपूरमध्ये राहत होता. तो मानकमऊ परिसरातील एका खासगी शाळेजवळच्या भाड्याच्या घरात राहात होता. या काळात त्याने व्ही-ब्रॉस आणि फेमस मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. त्याआधी तो अनंतनागमधील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. तो 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत जीएमसी अनंतनागमध्ये कार्यरत होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी सहारनपूरमधील हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्या नोंदी तपासल्या आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली. अदीलचं अंबाला रोडवरील अॅक्सिस बँकेत खातं असल्याचं तपासादरम्यान पोलिसांना कळलं. डॉ. अदीलचा विवाह 4 ऑक्टोबर 2025 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला होता. तो 26 सप्टेंबर रोजी सुट्टीवर गेला होता आणि काही कर्मचाऱ्यांना त्याने लग्नाची पत्रिकाही दिली होती. अदीलच्या अटकेनंतर हॉस्पिटल प्रशासनाने त्याच्या नावाची नेम प्लेट काढून टाकली आहे.
हॉस्पिटलचं काय म्हणणं आहे?
- फेमस मेडिकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापक मनोज मिश्रा म्हणाले, “जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये रुग्णालयात फिजिशियनचं पद रिक्त होतं, त्यामुळे मार्च महिन्यात अदीलची नेमणूक करण्यात आली होती. अटकेनंतर हॉस्पिटलने त्याच्या सेवा समाप्त केल्या आहेत.”
- स्थानिक पोलीस तपास करत आहेत, पण यावर भाष्य करणं टाळत आहेत. सहारनपूरचे सिटी एसपी व्योम बिंदल यांनी माध्यमांना सांगितलं की, “हे प्रकरण जम्मू-काश्मीर पोलिसांचं आहे, आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केवळ सहकार्य केलं आहे.”
- पोलीस आता सहारनपूरमध्ये अदील कोणाच्या संपर्कात होता, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी डॉ. अदील अहमद राथर सहारनपूरमधील व्ही ब्रॉस हॉस्पिटलमध्येही काम करत होता.
हरियाणातील फरिदाबादमधून अटक
- हरियाणातील धौज येथील अल-फलाह विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉ. मुझम्मिल शकीलला पोलिसांनी अटक केली आहे. या संयुक्त कारवाईदरम्यान पोलिसांनी डॉ. मुझम्मिल शकीलकडून आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याचा दावा केला आहे.
- डॉ. मुझम्मिलला 30 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान त्याच्या भाड्याच्या घरात स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याचे उघड झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
- फरिदाबादचे पोलीस आयुक्त सतेंद्र गुप्ता म्हणाले, “मुझम्मिल अल-फलाह विद्यापीठात शिकवायचा. त्याच्याकडून एक किर्निकोव्ह रायफल, एक पिस्तूल आणि टायमर जप्त करण्यात आला आहे.”
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कार शाहीन सईदच्या नावावर नोंदणीकृत असल्याची आढळून आली आहे. त्यानंतर शाहीनलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. “360 किलो ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पण ते आरडीएक्स नाही,” असं सतेंद्र गुप्ता यांनी सांगितलं.
- डॉक्टर मुझम्मिलची आई नसीमा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, “त्याला अटक झाल्याची माहिती आम्हाला इतरांकडून समजली. आम्ही त्याला भेटायचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी भेटू दिलं नाही.”
- मुझम्मिलला अटक केल्यानंतर फरिदाबादमधून महिला डॉक्टर शाहीन सईदला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुझम्मिलच्या जवळ सापडलेली कार ही शाहीनची असल्याचं सांगितलं जात आहे.
- मात्र, पीटीआयच्या वृत्तानुसार, पुलवामा येथे राहणारा डॉ. मुझम्मिलचा भाऊ आजाद शकीलनं त्याच्या भावावर खोटे आरोप लावले जात असल्याच सांगितलं. तो गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीमध्ये डॉक्टर म्हणून काम करत आहे. तो म्हणाला, ‘आम्हाला त्याला भेटू दिलं जात नाहीये. तो वर्षातून फक्त दोनदाच घरी यायचा’.
लखनऊ कनेक्शनचा तपास
- मंगळवारी पोलिसांनी फरिदाबाद येथून ताब्यात घेतलेल्या शाहीन सईदच्या लखनऊ येथील घराची तपासणी केली.
- लखनऊमध्ये डॉ. शाहीन सईदचे कुटुंबीय लालबाग येथील खंडारी बाजारात राहतात. शाहीनला दोन भाऊ आहेत. मोठा भाऊ शोएब सईद वडिलांसोबत राहतो, तर परवेज सईद आयआयएमच्या मडियांव भागाजवळ राहतो.
- तिचे वडील सईद अहमद अन्सारी म्हणाले, “माझी तीन मुले आहेत. शाहीन सईद दुसऱ्या क्रमांकाची आहे. तिने एमबीबीएस आणि एमडी अलाहाबाद मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं आहे.”
दिल्लीत स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख – अर्थमंत्री निर्मला सीतारामन
“आज संध्याकाळी दिल्लीत स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे खूप दु:ख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझे मनःपूर्वक संवेदना असून जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करते .” असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
दिल्लीतली घटना देश हादरला आहे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दिल्लीत सोमवारी सायंकाळी लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाशी झालेल्या स्फोटात काही कुटुंबियांनी आपले आप्त गमावले, अनेक जण जखमी झाले. या भयानक दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळतोय. मी व्यक्तिशः आणि शिवसेना पक्षातर्फे सहवेदना व्यक्त करतो, आणि या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना अंतःकरणपूर्वक श्रध्दांजली वाहतो. खुद्द पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी आणि मा.अमितभाई शाहजी तपासावर लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर राजधानी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपासाअंती स्फोटामागील कारणे स्पष्ट होतीलच.
सद्गती आणि सहवेदना… असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली आहे.
दिल्ली स्फोटाची बातमी खूपच चिंताजनक आणि दुःखद-राहुल गांधी
“दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी खूपच दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद अपघातात अनेक निष्पाप जीव गमावल्याने दुःख झालं आहे. या दुःखद काळात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबांबरोबर मी आहे आणि माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी मी आशा करतो”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
या घटनेमागे षडयंत्र आहे का याची चौकशी झाली पाहिजे- माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
“लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. काही लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त आहे आणि हे अत्यंत दुःखद आहे. हा स्फोट कसा झाला आणि त्यामागे काही मोठं षड्यंत्र आहे का? याची चौकशी पोलीस आणि सरकारने तातडीने करावी. दिल्लीच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा सहन केला जाऊ शकत नाही”, असं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे














