पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप करण्यासाठी निघालेला दिवाळी फराळाचा टेम्पो भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवला. त्यानंतर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हा फराळाचा टेम्पो नेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपकडून धंगेकरांच्या विरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपने तक्रार केल्यानंतर आमदार रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल असं पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी स्पष्ट केलं आहे. रविंद्र धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मार्च 2023 ला झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी ही जागा जिंकली होती. जी भाजपच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती.