इमारत बांधकाम दरम्यान कामगाराचा मृत्यू झाला. विकासक -ठेकेदार याच्या इमारत बांधकाम दरम्यान मजुर बापलेकांचा सुरक्षा अभावी मृत्यू झाला. सदर विकासक व ठेकेदारावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. नगाबाबा नगर, कैलास कॉम्प्लेक्स, घाटकोपर विक्रोळी पार्क साईट येथे एसआरए योजनेअंतर्गत निर्माणाधीन असलेल्या इमारतीचे तात्पुरते छत कोसळून त्यावर ठेवलेले पेवर ब्लॉक अंगावर पडून सुरक्षा रक्षक श्री. नागेश रेड्डी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरवेळी त्यांना जेवणाचा डब्बा द्यायला आलेल्या त्यांच्या १० वर्षाचा मुलगा रोहित याचा देखील जागेवर मृत्यू झाला आहे. बापलेकाच्या अशा दुर्देवी मृत्यूमुळे बांधकामाच्या ठिकाणी कायद्याने बंधनकारक असलेल्या सुरक्षा उपाययोजनांचे नियम विकासकाने धाब्यावर बसवले असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचप्रमाणे विकासकाने बांधलेले तात्पुरते छप्पर देखील अनधिकृत होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते ऍड.अमोल मातेले यांनी दिली.

सदर अनधिकृत बांधकामाबाबत झोपुप्रा आणि महापालिकेकडून वेळीच कार्यवाही झाली असती तरी संभाव्य दुर्घटना घडली नसती. त्यामुळेच नागेश रेड्डी आणि रोहित रेड्डी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित विकासक आणि प्रशासनाचे अधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रेड्डी यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपये आर्थिक भरपाई मिळावी. अशी मागणी राष्ट्रवादी प्रदेशप्रवक्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, प्रदेश प्रवक्ते नितीन देशमुख, विक्रोळी तालुकाध्यक्ष विजय येवले, यांनी विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कडे मागणी केली.