छत्तीसगडमधील बलोदा बाजार-भाटापारा जिल्ह्यातील एका गावात किरकोळ वाद आणि वैयक्तिक वैमनस्यातून लोकांना विषारी मद्य पाजल्याची घटना समोर आली आहे. आठ ग्रामस्थांची हत्या केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांचा असा दावा आहे की, चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणात, वेगवेगळ्या महिन्यांत मारल्या गेलेल्या लोकांचे मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आले आणि त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं.
मात्र, जमिनीखाली गाडलेला खजिना मिळवण्यासाठी आरोपीने या हत्या केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परंतु, पोलिसांनी या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.
पोलिसांचं म्हणणं आहे की, आतापर्यंतच्या तपासात असा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तसेच, चौकशीदरम्यान आरोपीनेही यासंदर्भात काहीही नमूद केलेलं नाही.
दरम्यान, आरोपीच्या मुलाने असा दावा केला की त्याच्या वडिलांना यामध्ये गोवलं जात आहे आणि ते निर्दोष आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक ओ.पी. शर्मा यांनी सांगितलं की, “कसडोलमधील खारवे गावातील रहिवाशांनी 6 जून रोजी गावातील आठ जणांच्या संशयास्पद मृत्यूबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपास आणि चौकशीच्या आधारे रामसहाय जयस्वाल या आरोपीला अटक करण्यात आली. किरकोळ वादातून दारूमध्ये विष मिसळून या लोकांची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.”
खारवे गावातील रहिवाशांचं म्हणणं आहे की, या वर्षी 6 फेब्रुवारी ते 14 मे या कालावधीत गावातील आठ जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, मद्यपान केल्यानंतर त्या सर्वांचा मृत्यू झाला आणि त्यांना शेवटचं त्याच गावातील रहिवासी असलेल्या रामसहाय जयस्वाल यांच्यासोबतच पाहण्यात आलं होतं. गावातील कामता प्रसाद साहू यांचे भाऊ छत्तूराम यांचं 12 मार्च रोजी निधन झालं, तर त्यांचे पुतणे विनोद साहू यांचं 31 मार्च रोजी निधन झालं.
















Leave a Reply