दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये 24 जून रोजी झालेल्या दोन शक्तीशाली भूकंपानंतर भारतानं मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत भारतानं बचाव पथकं, फील्ड हॉस्पिटल, औषधं आणि अत्यावश्यक मदतसाहित्य व्हेनेझुएलाकडे रवाना केले असून भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. व्हेनेझुएलाच्या प्रशासनानं सोमवारी (29 जून) दिलेल्या माहितीनुसार, या भीषण भूकंपात आतापर्यंत 1,719 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 5,000 जण जखमी झाले आहेत. तसेच 12 हजारांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. मात्र, अद्याप बेपत्ता नागरिकांची अधिकृत संख्या जाहीर करण्यात आलेली नाही.
भारताच्या व्हेनेझुएलास्थित दूतावासानं आज मंगळवारी (30 जून) ‘एक्स’ वर पोस्ट करत सांगितलं की, ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत भारतानं भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी आपले प्रयत्न अधिक वेगानं सुरू ठेवले आहेत. बचावकार्याबरोबरच जखमींवर उपचार करण्यासाठी फील्ड हॉस्पिटल, औषधे आणि अन्य जीवनावश्यक साहित्यही पाठविण्यात आलं आहे. व्हेनेझुएलामध्ये बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती स्थानिक प्रशासनानं व्यक्त केली आहे.
व्हेनेझुएलामध्ये भूकंपग्रस्तांसाठी भारतीय लष्करानं उभारलेल्या फील्ड हॉस्पिटलला आशिया, मध्य पूर्व आणि ओशिनिया विभागाच्या उपपरराष्ट्रमंत्री अँड्रिया कोराओ फारिया यांनी भेट देत भारतीय पथकाच्या कार्याचं कौतुक केलं.
व्हेनेझुएलातील भारतीय दूतावासाने ‘एक्स’ वर याबाबत माहिती देताना म्हटलं की, ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या फील्ड हॉस्पिटलला उपपरराष्ट्रमंत्री अँड्रिया कोराओ फारिया यांनी भेट दिली. त्यांनी भूकंपग्रस्तांना वैद्यकीय सेवा आणि मदत पुरविण्यासाठी भारतीय लष्कर करत असलेल्या कार्याचं विशेष कौतुक केलं.
दरम्यान, पनामा, निकाराग्वा आणि कोस्टा रिका येथील भारतीय दूतावासानंही भारताच्या मदत मोहिमेवर प्रकाश टाकला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दूतावासानं, “भारत व्हेनेझुएलासोबत ठामपणे उभा आहे. संकटकाळात विश्वासार्ह आणि सर्वप्रथम मदतीला धावून जाणारा देश म्हणून भारताची भूमिका कायम आहे,” असं म्हटलं आहे.
आतापर्यंत भारताकडून कोणती पोहोचविण्यात आली?
भूकंपानंतर भारताने ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत बचाव पथके, फील्ड हॉस्पिटल, औषधे आणि अन्य मदतसाहित्य व्हेनेझुएलाला पाठवून मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय लष्कराचं वैद्यकीय पथक तेथील जखमी नागरिकांवर उपचार करत असून मदतकार्य सातत्यानं सुरू आहे.
भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या दोन C-17 ग्लोबमास्टर विमानांद्वारे 41 सदस्यांचं बचाव पथक, भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल, 30 टन मदतसाहित्य, 6 टन औषधे व वैद्यकीय उपकरणे तसेच दोन ‘भीष्म क्यूब’ (BHISHM Cube) पोर्टेबल रुग्णालयं व्हेनेझुएलात पोहोचविण्यात आली आहेत.
दूतावासानं सांगितलं की, व्हेनेझुएलाच्या प्रशासनाच्या समन्वयानं भारतीय बचाव आणि वैद्यकीय पथके युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. जखमींवर तातडीने उपचार करणं, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेणं, बचाव मोहीम राबविणं आणि प्रभावित नागरिकांना जीवनावश्यक मानवतावादी मदत पोहोचविण्याचं काम सुरू आहे.
भारतानं यावेळी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचा पुनरुच्चार करत व्हेनेझुएलाच्या नागरिकांसोबत खांद्याला खांदा लावून उभं असल्याचं स्पष्ट केलं आहे. या कठीण काळात शक्य ती सर्व मदत करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं दूतावासानं नमूद केलं.
















Leave a Reply