इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यविधी कार्यक्रमाला 4 जुलैपासून सुरुवात होणार आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर इराणमधील पवित्र शहर असलेल्या मशहद या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवलं होतं. त्यामुळं नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र, नरेंद्र मोदींऐवजी भारताचे दोन प्रतिनिधी इराणला अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यविधीला पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भारताकडून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अयातुल्ला अली खामेनेई यांचा 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. यानंतर मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर अयातुल्ला अली खामेनेई यांचे अंत्यसंस्कार पुढं ढकलण्यात आले होते. मात्र, आता इराण आणि अमेरिका यांच्यात तात्पुरता युद्धविराम झाल्यानंतर अयातुल्ला अली खामेनेई यांचे अंत्यसंस्कार 4 जुलै रोजी पार पडतील. त्यांच्या स्मरणार्थ एक भव्य समारंभ आयोजित केला जाईल, ज्यामध्ये अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवलं होतं. त्यामुळं नरेंद्र मोदी स्वतः तेहरानला भेट देतील की नाही? याबद्दल राजकीय वर्तुळात अटकळ बांधली जात असली तरी, त्यांच्या या निर्णयामागील कारण आता स्पष्ट झालं आहे. ते म्हणजे, आपल्या पूर्वनियोजित आणि व्यस्त आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळं नरेंद्र मोदी इराणला प्रवास करू शकणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी लवकरच इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत.
भारतानं इराणला नेहमीच एक महत्त्वाचा भागीदार मानलं आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शोक व्यक्त करण्यासाठी इराणी दूतावासाला भेट दिली होती. इतकंच नाही तर, 40 दिवसांच्या युद्धादरम्यान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणी नेतृत्वाशी नियमित संवाद साधला होता. अलीकडेच, इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ब्रिक्स बैठकीसाठी नवी दिल्लीला वैयक्तिक भेट दिली होती. यापूर्वी, 2024 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात तत्कालीन इराणी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रियासी यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं.
4 जुलैपासून अयातुल्ला अली खामेनेई यांचं पार्थिव तेहरानच्या ‘ग्रँड मोसल्ला कॉम्प्लेक्स’मध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर तेहरान आणि पवित्र शहर ‘कोम’मध्ये मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढण्यात येतील. त्यानंतर 9 जुलै रोजी अयातुल्ला अली खामेनेई यांचे मूळ गाव मशहद येथील पवित्र ‘इमाम रझा दर्गा’ इथं त्यांच्या पार्थिवाचं दफन केलं जाईल. या काळात इराणमध्ये लाखो लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, इराक, रशिया आणि चीनचे प्रतिनिधीही या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
















Leave a Reply