मुंबईमधील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. ते मुंबईतील सायन-कोळीवाडा मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक होते. मात्र, पक्षाने त्यांची दखल न घेतल्याने रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांच्याकडे संघटनेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत. रवी राजा यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्ष सोडण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी रवी राजा यांनी पत्रकार परिषदेत आपल्या भाषणाला सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख राज्याचे भावी मुख्यमंत्री असा केला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी रवी राजा यांना लगेच थांबवत प्रसारमाध्यमांच्या दिशेने पाहत, हे वाक्य सेन्सॉर करा, असे म्हटले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला. विधानसभा निवडणुकीमुळे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, याची सतत चर्चा सुरु आहे. त्यामुळे रवी राजा यांनी देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री, असा केलेला उल्लेख अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा आमच्यासोबत येत आहेत. एक आक्रमक भूमिका मांडणारा नेता ज्यांनी पाच टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. मोठा जनसंपर्क आहे. भाजपला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात काँग्रेस मधील आणखी काही प्रवेश भाजपमध्ये होतील. येत्या काळात आणखीनही लोक भाजपात येणार आहेत, वेळ आली की त्यांची नावं जाहीर होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पुन्हा महायुती सरकार सत्तेत येणार आहे. काही ठिकाणी क्रॉसफॉर्म आले होते. काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. क्रॉसफॉर्म परत होतील. काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे त्याबाबत देखील रणनीती झाली आहे. पक्षांतर्गत बंडखोरीवरही चर्चा झालीय, त्यांनाही समजावलं जाईल.
गोपाळ शेट्टी पक्षाचे प्रामाणिक सैनिक आहेत. त्यांनी नेहमीच पक्षाचा आदेश मानलाय, यावेळी ते मानतील अशी अपेक्षा आहे. माहीमबाबत बोलणी सुरू आहेत, एकत्रित मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल मुख्यमंत्री आणि अजित पवारांसोबत बैठक पार पडलीय, क्रॉस फॉर्म जिथं जिथं भरलेत ते परत घेतले जातील. सर्व मतभेद दूर झाल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
क्षेत्रिय अस्मितेसोबत राष्ट्रीय अस्मिताही महत्त्वाची आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची राष्ट्रीय अस्मिता स्वीकारली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा दिवाळी शुभेच्छांचा फोन आला नाही, पण माझ्या दोघांना जाहीर शुभेच्छा आहेत. लोकसभेला आडम मास्तर यांना काँग्रेसने चॉकलेट दिलं. आता देखील तेच झालं. त्यामुळे आडम मास्तर सारख्या लोकांनी कोण वापर करुन घेतं आणि कोण उपयोगी पडतं याचा विचार करावा. माझा राहुल गांधी यांना सवाल आहे की त्यानी उत्तर प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगढ इथं जी आश्वासन दिल होतं त्याचं पुढं काय झालं? त्यांचं फेक गॅरटी कार्ड आहे. ते म्हणाले.
नवाब मलिक यांचा आम्ही प्रचारच करणार नाही तर मग सत्तेत सहभागी करायचा विषय येत नाही. त्यांच्या विरोधात शिवसेनाचा उमेदवार आहे आम्ही त्याचा प्रचार करणार आहे. नवाब मलिक यांच्या बाबत अधिकृत भूमिका आशीष शेलार यांनी मांडली आहे. मी देखील हेच म्हटलं आहे की आमची तीच भूमिका आहे. नवाब मलिकांबाबत आशिष शेलारांनी अधिकृत भूमिका मांडलेली आहे, त्यावर आता मी परत बोलणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.