kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ; जाणून घ्या कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसंच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते.

अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आगोयाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

काय आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया?

आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

माध्यमांशी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हा निर्णय आम्हाला अपेक्षित होता. जे शिवसेनेबरोबर केलं, तेच आमच्याबरोबर होईल. याची आम्हाला कल्पना होती. शरद पवार यांनी अनेकदा शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. त्यांनी ६० व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला. आता पुन्हा आम्ही पक्ष उभा करू. आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचाच आहे, हे पूर्ण देशाला माहीत आहे. पण काही अदृश्य शक्तींनी आमच्याकडून पक्ष काढून घेतला.”

काय आहे जयंत पाटील यांची प्रतिक्रिया ?

“निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.