भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक मोठा दावा केला आहे. राणे यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. 4 जूननंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये येणार आहेत. त्यात विजय वडेट्टीवार यांचंही नाव असेल. 4 जूननंतर भाजपवासी होण्याची वडेट्टीवार यांनी तयारी करावी. वडेट्टीवार जिथून निवडून येतात तिथूनच महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात आम्हाला काँग्रेसमधील अदृश्यशक्तींनी मदत केलीय, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
नितेश राणे हे सहकुटुंब शिर्डीला आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साईबाबांचे आशीर्वाद राहावे आणि पुन्हा त्यांच्याकडेच देशाचं नेतृत्व राहावं म्हणून मी प्रार्थना केली आहे. देश हिंदूराष्ट्र म्हणून अधिक भक्कम करण्यासाठी मोदींचे नेतृत्व मिळो, अशी प्रार्थना साईबाबांना केली असल्याचं नितेश राणे म्हणाले. येत्या 4 जून रोजी महायुती अत्यंत ताकदीने निवडून येणार आहे. राज्यातील जनतेने मोदींच्या विचारांचे प्रतिनिधी निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे. 4 जून रोजी आम्हीच गुलाल उधळणार आहोत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ते भुजबळांचं वैयक्तिक मत आहे. पक्षाचा आणि नेतृत्वाचा त्याच्याशी काही संबंध नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कुणीही सहन करणार नाही. आव्हाड यांनी जो प्रकार केला तोच जर भाजप नेत्यांकडून घडला असता तर मविआच्या नेत्यांनी धिंगाणा घातला असता. आपल्या हातात काय आहे आणि काय फाडतो याची जाणीव पाहिजे. कधी शिवरायांचा अपमान, कधी औंगाबजेबाचे उदात्तीकरण, कधी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचा. नंतर म्हणायचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे बाप. मग अपमान करण्याची हिम्मत कशी होते?, असा सवाल राणे यांनी केला. ते जाणून बुजून केलेले कृत्य. यातून मविआच्या नेत्यांची मानसिकता कळते, असा हल्लाही त्यांनी चढवला.