मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आगामी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केल्यानंतर मनसेने देखील आपला उमेदवार दिली आहे. मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे.

मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेने आपला उमेदवारी जाहीर केला आहे. मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ आता भाजपाचा बालेकिल्ला आहे. येथून भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार आहेत. ते सलग तिसऱ्यांदा येथून निवडणूक लढवणार आहेत.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून किरण शेलार आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी निरंजन डावखरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनेचे डॉ दीपक सावंत यांचे नाव मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी चर्चेत आहे. मुंबईत मनसे उमेदवार देणार की नाही याबाबत अजून स्पष्ट झालेले नाही. मनसे नेत्यांनी म्हटले होते की, महायुतीला दिलेला पाठिंबाहा फक्त लोकसभा निवडणुकीपुरताच मर्यादीत होता. त्यामुळे आता रंजक वाढली आहे. मनसेने जर उमेदवार दिला तर महायुतीला फटका बसू शकतो. त्यामुळे आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याची शक्यता आहे.

कोण होते आमदार ?

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर) किशोर भिकाजी दराडे (नाशिक शिक्षक) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक) यांचा 7 जुलै 2024 रोजी कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे येथे निवडणुका होणार आहेत.

31 मे 2024 रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 7 जून 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणारे. 12 जून 2024 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. 26 जून 2024 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदारसंघात मतदान होणार आहे. तर १ ते ५ जुलै 2024 पर्यंत ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.