kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘शिवालिक’ गुजरातमध्ये दाखल

मध्य पूर्वेतील तणावामुळे गॅस टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, युद्धजन्य परिस्थिती असलेल्या ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पार करून ‘शिवालिक’ हा एलपीजी टँकर गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुखरूप दाखल झाला आहे. भारतीय ध्वज असलेली ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ ही दोन जहाजे लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस घेऊन येत होती. इराणच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी दिली होती.

शिपिंग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी शनिवारी माहिती दिली होती की, “शिवालिक आणि नंदा देवी ही जहाजे अनुक्रमे १६ आणि १७ मार्च रोजी भारतात पोहोचण्याची शक्यता आहे.”

सिन्हा म्हणाले, पर्शियन गल्फ प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि गेल्या २४ तासांत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. पर्शियन गल्फमध्ये भारताचे ध्वज असलेली एकूण २४ जहाजे होती. त्यापैकी ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ या दोन गॅस वाहक जहाजांनी काल रात्री उशिरा हॉर्मुझची सामुद्रधुनी पार केली असून ती भारताकडे मार्गस्थ झाली आहेत. ही जहाजे सुमारे ९२,७०० मेट्रिक टन एलपीजी वाहून नेत आहेत. ही जहाजे मुंद्रा आणि कांडला बंदराकडे येत असून १७ मार्चपर्यंत दोन्ही जहाजे भारतात पोहोचतील. सध्या पर्शियन गल्फमध्ये भारताची २२ जहाजे असून त्यावर ६११ खलाशी आहेत.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या संकटाच्या काळात इराणशी थेट संवाद साधण्यावर भर दिला होता. ‘फायनान्शिअल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर यांनी स्पष्ट केले की, जागतिक तेल व्यापाराच्या २० टक्के वाटा असलेल्या या जलमार्गातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भारत इराणच्या संपर्कात आहे. इराणशी संवाद साधल्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. चर्चा सोडून देण्यापेक्षा समन्वय साधून तोडगा काढणे भारताच्या हिताचे आहे. शिवालिक आणि नंदा देवी जहाजांचा प्रवास हा याच राजनैतिक प्रयत्नांचा परिणाम आहे.”

सर्व भारतीय जहाजांसाठी अद्याप कोणताही सरसकट करार झालेला नसून, सध्या प्रत्येक जहाजाच्या प्रवासासाठी स्वतंत्रपणे समन्वय साधला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, इराणच्या सर्वोच्च नेत्याचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनीही याला दुजोरा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पश्चिम आशियातील संघर्षाच्या काळातही भारतीय जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवासाची परवानगी दिली जाईल. आमची दूतावास भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.