जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर भव्य जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी मतांच्या टक्केवारीनुसार भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला, असा दावा केला. “नवरात्रीचा सहावा दिवस आहे. देवीच्या प्रार्थनेचा दिवस आहे. देवी वाघावर विराजमान आहे आणि देवीच्या हातात कमळ आहे. देवी आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे. अशा पवित्र दिवशी हरियाणाता सलग तिसऱ्यांदा कमळ फुललं आहे. गीताच्या भूमीवर सत्य, विकास आणि सुशासनची जीत झाली आहे. प्रत्येत जाती आणि वर्णाच्या लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कित्येक दशकांच्या प्रतिक्षेनंतर अखेर शांततेत निवडणूक पार पडली आहे. मतमोजणी झाली, निकाल समोर आले की, भारतीय संविधानाची जीत आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“भारताच्या लोकशाहीची जीत आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांच्या आघाडीला जास्त जागा दिल्या आहेत. मी त्यांनाही शुभेच्छा देत आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर जम्मू-काश्मीरमध्ये जेवढे पक्ष निवडणूक लढत होते त्यामध्ये मतांच्या आकडेवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे”, असा मोठा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

“मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विजय मिळवणाऱ्या सर्व उमेदवारांनादेखील खूप खूप शुभेच्छा देतो. मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या जनेतलाही शुभेच्छा देतो. मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या तप आणि तपश्चर्यासाठी नमन करतो. हरियाणाचा हा विजय कार्यकर्त्यांच्या अफाट परिश्रमाचा परिणाम आहे. हा विजय राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि हरियाणाच्या टीमच्या परिश्रमाने मिळाला आहे. अतिशय नम्र आणि विनम्र मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याचा हा विजय आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“हरियाणाच्या जनतेने एक नवा इतिहास रचला आहे. हरियाणाची निर्मिती 1966 मध्ये झाली होती. इतक्या वर्षात अनेक मोठमोठ्या दिग्गजांनी या राज्याचं नेतृत्व केलं, ज्यांना संपूर्ण देश ओळखायचा. हरियाणाच्या त्या दिग्गज नेत्यांचं नाव संपूर्ण देशात चर्चेत असायचं. हरियाणात आतापर्यंत 13 निवडणुका झाल्या. त्यापैकी प्रत्येकी 10 निवडणुकीत हरियाणाच्या जनतेने दर पाच वर्षात सरकार बदललं. पण यावेळी हरियाणाच्या जनतेने जे केलं ते अभूतपूर्व आहे. ते आधी कधीच घडलं नाही”, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *