kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुणे मेट्रोच्या स्थानकाजवळील बस थांबा हलवला ; प्रवाशांची गैरसोय

रामवाडी मेट्रो स्थानक परिसरातील पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) बसथांबा वाहतूक कोंडीचे कारण देऊन २०० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. या निर्णयामुळे मेट्रोने प्रवास करून पुढे बसने जाणाऱ्या प्रवाशांना पायपीट करावी लागत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र, मेट्रो स्थानकाच्या खाली कायम रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नगर रस्ता परिसरातील विमाननगर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, वाघोली येथील नागरिक मोठ्या प्रमाणात शहराच्या मध्यवर्ती भागात; तसेच पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी मेट्रोचा वापर करतात. रामवाडी मेट्रो स्थानकातून दररोज १५ ते २० हजार प्रवासी प्रवास करीत असल्याचे दिसून येते. यापैकी काही जण स्वतःचे वाहन स्थानकाजवळ उभे करतात; पण पार्किंगची मर्यादित जागा लक्षात घेता मोठ्या संख्येने प्रवासी पीएमपी बसचा पर्याय निवडतात. यापूर्वी मेट्रो स्थानकाच्या खालीच पीएमपीचा थांबा असल्याने प्रवाशांना सहजपणे पुढील प्रवास करता येत होता. आता थांबा पुढे हलवल्याने मेट्रोतून उतरून बसपर्यंत पोहोचण्यासाठी किमान २०० मीटर अंतर चालावे लागते. विमानतळाकडे किंवा तेथून परतणाऱ्या प्रवाशांकडे मोठे सामान असल्याने त्यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाहतूक पोलिसांनी कोंडीचे कारण देत पीएमपी प्रशासनाला थांबा हलवण्याची सूचना केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, मेट्रो स्थानकाच्या खाली अद्यापही रिक्षा, कॅब आणि पिवळ्या टमटम मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोंडीस कारणीभूत ठरणारे हे वाहनप्रकार नाहीत का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. नवीन प्रवाशांना थांबा पुढे हलवण्यात आल्याची माहिती नसल्याने काही जण नाईलाजाने रिक्षाचा पर्याय स्वीकारतात. स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या काही रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारीही आहेत. स्थानकाजवळच पुढे मोकळी जागा आणि रुंद रस्ता उपलब्ध असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्या ठिकाणीच बसथांबा केल्यास मेट्रोमधून उतरल्यावर लगेच बस मिळेल आणि पायपीट टळेल, असे मत व्यक्त होत आहे.

वाहतूक कोंडीचे कारण देऊन पोलिसांनी रामवाडी मेट्रो स्थानकाबरोबरच अनेक ठिकाणचे पीएमपीचे थांबे हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. थांबे न हलवल्यास वारंवार सूचना दिल्या जातात. त्यामुळे पीएमपीने रामवाडीबरोबरच शिवाजीनगर येथील सीओईपी होस्टेल येथील दोन थांबे पुढे हलवले आहेत. हिंजवडी येथील काही थांबेही हलवावे लागले होते. आता शिवाजीनगर येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या समोरील थांबा हलवण्याचे पत्र देण्यात आले आहे. तो थांबा हलवला, तर प्रवाशांना मोठी पायपीट करावी लागणार आहे. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनांचा पर्याय निवडतील. ज्या ठिकाणचे थांबे हलवले आहेतस तिथे कायम रिक्षा, कॅब उभ्या असतात. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’समोर सायंकाळी सात ते रात्री ११ या वेळेत कायम खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असतात. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते; पण या गोष्टींकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे.