एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले. त्यांच्या या दौऱ्यामागे आयकर विभागाच्या नोटिशीचा संदर्भ तर नाही ना असा संशय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. सरडा धोका बघून रंग बदलतो, माणूस मोका बघून रंग बदलतो. पण मोक्यापेक्षा आयकर विभागाचा धोका मोठा असल्याचा टोला सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली दौरा आटोपला. यामध्ये त्यांनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. हा दौरा नेमका कशासाठी याची माहिती मात्र कुणालाच नव्हती. त्यातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं आणि अंधारेंनी त्यावरुन एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
आपल्याला आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्याचसोबत श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस आल्याचं संजय शिरसाट म्हणाले. नंतर त्यांनी यावरून यू टर्न घेतला आणि श्रीकांत शिंदे यांचे नाव चुकून घेतल्याचं म्हटलं.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?
रंग बदलणाऱ्या सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये एवढ्याच फरक आहे; सरडा “धोका” बघून रंग बदलतो.. माणूस “मोका” बघून रंग बदलतो..
गुरुपौर्णिमेचा “मोका” असला म्हणून काय झालं, आयकर विभागाच्या नोटीशीचा “धोका” त्यापेक्षा मोठा आहे..!! दिघे साहेब बघताय ना..?











