Breaking News

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा; मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे वगळल्याचा दावा

मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यात मतदार यादीतून मोठ्या संख्येने नाव वगळल्याचा काँग्रेसचा दावा आहे. पक्षाने जे आरोप केले आहेत, त्याच्या पडताळणीसाठी आयोगाने तपशील पुरवावा अशी मागणी पक्षाने केली.

काँग्रेसच्या शिष्टमंडळात अभिषेक मनु सिंघवी, मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा प्रामुख्याने समावेश होता. निवडणुकीतील पक्षपातीपणाने लोकशाहीला धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचे सिंघवी यांनी नमूद केले. लोकसभा ते विधानसभा या पाच महिन्यांत मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून नावे वगळण्यात आली. त्याचा तपशील मागितल्याचे सिंघवी यांनी स्पष्ट केले. या कालावधीत ४७ लाख मते कशी वाढली असा प्रश्नही विचारला. आयोगाने आम्हाला ३६ लाख हा आकडा सांगितला. मात्र तोही कमी नाही असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, सर्व आक्षेपांना उत्तर देऊ असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

आयोगाने मतदानादिवशी पाच वाजता ५८ टक्के मतदान झाल्याचे सांगितले. मात्र साडे अकरा वाजता ही टक्केवारी ६५.०२, तर दोन दिवसांनी टक्केवारी ६६.०५ जाहीर केली, म्हणजे ७६ लाख मतदान वाढले. असे सिंघवी यांनी निदर्शनास आणले.