kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ज्येष्ठा गौरीची ही कथा माहित आहे का ??

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौराई आणल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बाबाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडेआली. बाबा, बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील! बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. त्याला दुःख झाले. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरीबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला अन संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याला कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं सर्व कहाणी सांगितली. म्हातारीनं त्याला बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. ही पाहुणी कोण म्हणून विचारलं. नवर्‍यानं रस्त्यात आजी भेटली म्हणून सांगितलं.

बायको आत गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. एक मडकं कण्‍यांनी भरलेलं तिच्या दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. मग तिने पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सर्व जण आनंदानं झोपले. सकाळ झाली तशी म्हतारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग असं म्हणत घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रडगाण काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अंग अंग, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं त्यानं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली.. मग सगळं सामान आणलं: ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांच दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणांने त्यांचं दूध काढलं.

दुसर्‍या दिवशी आजीला खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला,मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच आहे! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग! गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्‍या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी काही कमी पडणार नाही. संसारात भरभराट होईल.

ब्राह्मणानं मग तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. पाण्यानं धुवावे. जेष्ठागौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांनी स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. सतत संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.