लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. आता या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. त्याआधी एक्झिट पोल आणि निवडणुकीचा निकाल काय लागेल? याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. आम्हाला खूप आशा आहे की, निवडणुकीचे निकाल एक्झिट पोल दाखवत असलेल्या विरुद्ध असतील”, असं सोनिया गांधी यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीए आघाडी देशात ३५० पार करेल असा अंदाज एक्झिट पोलची आकडेवारी सांगत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांवर यश मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे हा आकडा महायुती पार करेल, असा अंदाज एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार समोर आला आहे. तर इंडिया आघाडीचा धुव्वा उडण्याची शक्यता आहे.