भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1980 साला पिचड हे पहिल्यांदा विधानसभेवर काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी शरद पवारांना साथ दिली होती. पिचड यांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद ही सांभाळले होते. शिवाय ते आदिवासी विकास खात्याचे मंत्रीही होते. 2019 साली त्यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मधुकर पिचड यांचा संपूर्ण प्रवास
मधुकर काशिनाथ पिचड, माजी मंत्री
जन्मतारीख – ०१ जून १९४१
जात – महादेव कोळी
गाव – राजुर, अहिल्यानगर, वडील शिक्षक होते.
शिक्षण – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी ए एल एल बीचे शिक्षण. तिथूनच विद्यार्थी राजकारणाला सुरुवात
राजकीय प्रवास –
- अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड
- १९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड
- १९८० पासून २००९ पर्यन्त सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले
- १९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.
- राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती
- मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिलाय.
- राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले
- २०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.
- मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली
- मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला
- आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडलीये